मानसपूजा

ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये,
पाय घड्या या स्वागत उत्सुक, प्रसन्न होऊन ये ।
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये,
मानसपूजा तुझी मांडली, भक्तवत्सले ये ।
बैस गं आई चौरंगावर,पाणी घालते,
पदकमलांवर,आनंदाच्या लहरी केवळ,
स्पर्श तुझ्या चरणांचा दे,
ये अंबे ये, माझ्या मनमदिरी ये ।
आई तुला गं स्नान घालते,
धूप दीप, फळं फूलं अर्पिते,
गंगायमुना नेत्री दाटल्या,
भावपूर्ण प्रणिपात घे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
आज आई गं तुला नटविते,
भरजरी साडी, वेणी देते,
अलंकार घे सौभाग्याचे,
आरशात बघ, हास्य दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
तुझ्याचसाठी, रांधिली मी गं,
पुरणवरण, अन खीर पक्वान्नं,
जेव गं आई आनंदाने,
तृप्तीची मग पोच दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
आई तुझी गं लेक बावरी,
रिझविण्या तुज गाणी गाई,
आनंदाने नाचही मग करी,
कौतुकाने ताल दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
विश्वजननी गिरीजा तू गं,
तुझ्यामुळे, अन तुझीच मी गं,
तुझ्याच ठायी अर्पियते गे,
सर्व काही दुर्गे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
उठता, बसता, फिरता चित्ती,
एक जाणीव तुझीच भक्ती,
प्रमाद माझे अनंत तरीही,
पदरी मजला घे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
मानसपूजा तुझी मांडली, भक्तवत्सले ये ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Unknown said…
प्रणाम अंबामातेला आणि तुम्हाला पण इतकी रसरशीत भक्तिपूर्ण आणि भावपूर्ण कविता लिहिल्याबद्दल ........
Unknown said…
खूप भक्तीभाव आहे कवितेत आणि तुमच्या मनात...
मला कधीच नाही येणार अशी कविता लिहायला....
मानसपूजा...

Real concept...gr8 poem

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?