चर्पटपंजरिका : मराठी काव्यानुवाद

आदि शंकराचार्यांच्या चर्पटपंजरिकास्तोत्राचा मराठी अनुवाद,

दिवसरात्र अन सकाळसंध्या, शिशिरवसंत येई पुन्हा,

काळ नेई तो आयुष्या, सुटत नाही ती तरी आशा ।

भज गोविंदा, भज गोविंदा, भज गोविंदा, खुळ्या मना,

व्याकरणाची, नाही रोखती मृत्युखुणा ।

आग समोरी, सूर्यही पाठी, रात्री थंडीने, गुडघी हनुवटी,

तरुतळवासी, हाती भिक्षा, सुटत नाही ती तरी आशा ।

जोवरी पैसा कमवू शकतो, घरात तुजला मानच असतो,

शरीर जर्जर जेव्हा होते, तुझी कुणाला फिकीर नसते ।

जटा ठेवीसी, मुंडण करीसी, संन्याशाचे वस्त्र घालसी,

उगाच डोळे मिटवून बससी, पोटासाठी सोंगही घेसी ।

श्रध्दापूर्वक, गीता वाचशी, गंगेचा जरी थेंबही पीशी,

प्रेमाने, हरीपूजा करीशी, यमदूताची मग भीती कैशी?

गलितगात्र अन मानही हलते, दाताविण ते तोंड बोळके,

डुगडुगणा-या हाती काठी, किती ओढ ती जगण्यासाठी ।

बाळपणी तू, खेळी रमसी, तरुणपणी तरुणीत गुंतसी,

वृध्दपणी अन चिंता करसी, परमात्म्याला, कधी न स्मरसी ।

परत जन्मणे, परतच मरणे, परत आईच्या उदरी निजणे,

भवसागर हा अवघड तरीही, तूच मुरारी, लंघून नेणे ।

परत रात्र अन परतच दिवस, परत पक्ष अन परतच मास,

परत अयन, अन संवत्सर ते, तरीही आशा कोण टाकते?

कसली वासना, वय हे झाले,तळे कसे ते, पाणी आटले,

कुटुंब कसले, पैसे संपले, जीवन कसले, ज्ञान मिळाले?

नारी अंग अंगाचे वर्णन, मिथ्या माया, मोहाकारण,

मांस अस्थिचा केवळ गोळा, सतत विचार हे तू मनाला ।

तू कोण मी कोण, आलो कुठूनी? कोण माझे पिता नी जननी,

सर्व असार, जाण तू मनी, स्वप्नासम दे विश्व त्यागूनी ।

गाण्यालायक भगवदगीता, भजण्यालायक तोच अनंता,

मनास नेण्या सज्जनसंग, धनास देण्या दीन अपंग ।

जोवरी देही जीव राहे, घरी तोवरी पृच्छा आहे,

देहामधूनी जीव गेला, पत्नीही घाबरे, त्या देहाला ।

सुखात घेसी नारी भोग, नंतर शरीरी येती रोग,

ठरलेले हे जगात मरण, तरी न सोडसी पापाचरण।

शिवसी गोधडी, चिंध्या जोडूनी, पंथ बनविसी विवेक सोडूनी,

मी, तू सारे, विश्वच खोटे, तरीही करीतो दुःखच मोठे।

गंगासागरी वारी करीती, व्रत करीती, अन दानही देती,

ज्ञानाविण हे सारे करीती, शतजन्मे तरी प्राप्त न मुक्ती ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?