प्रणाम तुज शारदे, ज्ञानदे, प्रणाम तुज शारदे,
शुभ्रवसनावृता कमलिनी, सरस्वती ज्ञानदे, शारदे ।
-.
तू शब्द कंठातला, तू अर्थ शब्दातला,
आनंद अर्थातला, मूळ चारी वाणीचे ।
.
तू नाद प्रणवातला, तू स्वरा तू चित्कला,
वीणाधारिणी, जीवनी, आनंदघन बरसु दे ।
.
तू ज्ञानियांचि निवृती, समाधीतून आकृती,
परब्रह्माच्या स्वरुपा, साररूप जाणणे..!
.
खरचं, सरस्वती म्हणजे नेमकं काय? ती ज्ञान कला देणारी देवता आहे..हे माहित आहे..तिचे चित्र, मुर्ती पाहिल्यामुळे तिचं सगुण रुप माहित आहे. पण हे सगुण रुप, ज्या कल्पनेचं प्रतीक आहे, ती कल्पना नेमकी काय आहे? अभ्यास केल्यावर हे मिळालं.काव्यात स्फुरलं.. सरस्वती कंठातला शब्द आहे. शब्दातला अर्थ , अर्थातला आनंद.. म्हणजे सरस्वती...! प्रणवातला, ओंकारातला नाद म्हणजे सरस्वती...! कलेची प्रेरणा, कलेतला आनंद म्हणजे सरस्वती....! परब्रह्म म्हणजे नेमकं काय? जे ज्ञानी लोकांना समाधी अवस्थेत जाणवलं, ते वर्णन कसे करणार? पण त्याचं सार आपल्या सामान्य लोकांसाठी देणं जिच्यामुळे शक्य झालं, ती सरस्वती....!
तिचं सगुण रूपही किती विलोभनीय आहे...! ती शुभ्रा आहे, ती शुभ्रवसना आहे, ती वीणा्धारिणी आहे.. तिच्या हातात पुस्तक आहे. ती हंसवाहिनी आहे...!
बुद्धी निर्मळ दे, विमले, विभावरी वरदे ।
वीणापुस्तकधारिणी, वादिनी, सरस्वती विद्ये,
शब्दां अर्थ दे, मंगले, प्रासादिक वाणी दे ।
.
अज्ञानाचा तिमीर हरू दे, ज्ञानदीप तेवू दे,
निर्मळ त्या प्रकाशात अवघे, आयुष्य हे उजळू दे ।
स्वरसाधना करतसे, आनंदघन बरसू दे,
हे अक्षरा, स्वरा, धीश्वरी, कंठी मधुर गीत दे ।
..
( सौ. शैलजा शेवडे)
(सौ. शैलजा शेवडे)
Comments