कसा आहे गं तो?
'कसा आहे गं तो?'
तिनं आपल्या जिवलग मैत्रिणीला विचारलं.
नियतीच्या एका फटका-याने,
परक्या झालेल्या आपल्या प्रियकराबद्दल,
ती नववधू विचारत होती.
'जाऊ दे ना तो विषय..'
मैत्रिण तिला त्याच्या विचारातून,
बाहेर काढू पहात होती.
'प्लीज...सांग ना गं..'
तिच्या अश्रूत मैत्रिण विरघळली.
'अगं, काय सांगायचं?
तुझं लग्न ठरलेलं कळल्यापासून,
तो बिथरलायं..जेवत नाही..खात नाही..
कुणाशी बोलत नाही..
आजकाल तर तो दारूही पिऊ लागलायं...! '
ती कळवळली...
माझ्यामुळे त्याच्या आयुष्याचं मातेरं होतयं.
नियतीवर राग म्हणून ती संन्यस्त बनली.
गुलाबाच्या शय्येचंही सुख तिनं घेतलं नाही.
..................................................
....................
'आता कसा आहे गं तो?'
खूप वर्षांनी भेटलेल्या मैत्रिणीला तिनं विचारलं.
'तो? मस्त मजेत आहे...
तुझं लग्न झाल्यावर त्यानंही लगेच लग्न केलं.
संसारात रमलायं.
परवा तर कसलासा पुरस्कारही मिळाला त्याला..
त्याने त्याच्या बायकोला तो अर्पण केला.
'बायकोमुळे मी हे यश मिळवलेयं........'
टी.व्ही.वरच्या मुलाखतीत तो म्हणला.'
त्याचं जाऊ दे..तू कशी आहेस?'
मैत्रीण म्हणली.
'मी ठीक आहे.'
ती बळेच हसत म्हणली.
अजूनही ती रडतच होती आतल्या आत..
पण आता एक विचित्र सूरही त्यात आला होता.
असूयेचा....
स्वतःवरील, त्याच्यावरील रागाचा...!
.
( सौ. शैलजा शेवडे)
Comments