मिलिट्रीतले आजोबा
माझे वडिल मिलिट्रीत होते...कडक शिस्तीचे होते.पण स्वभावाने प्रेमळ होते. त्यांना खरं तर तिथल्या जीवनाबद्दल विचारायचं होतं.. राहूनच गेलं...! लडाख सारख्या दुर्दम ठिकाणी आपले सैनिक रहात असत , तेव्हा कुटुंबियांच्या पत्राची अगदी चातकाप्रमाणे वाट बघत. 'दुरून पोस्टमन येतांना दिसला की वय, हुद्दा विसरून सगळे धावत..' त्यांचे हे शब्द काळजात रुतले आहेत.माझ्या वडिलांवर मी लिहिलेली एकमेव कविता...ती पण जणु माझी मुलं आजोबांचं वर्णन करत आहेत, अशा प्रकारे...
..
मिलिट्रीतले आजोबा
..
मिलिट्रीतल्या आजोबांची सहा फूट उंची,
बसायला लागते त्यांना, मस्त आरामखुर्ची |
.
.....मिलिट्रीतल्या आजोबांची, मूर्ती आहे खाशी,
.....घारे डोळे, गोरा रंग, झुपकेदार मिशी |
.
लहानथोर सगळे जमतात, आजोबांच्या भोवती,
आजोबा सांगतात रंगवून, युद्धाच्या गोष्टी |
.
.....गोष्टी असतात रंगतदार, मिलिट्रीतल्या आजोबांच्या,
.....कधी महायुद्धाच्या, कधी स्वातंत्र्यलढ्याच्या |
.
ब्रह्मदेशात राहिले होते, युद्धकैदी म्हणून,
इंग्रजांशी लढले होते, स्वातंत्र्यसैनिक बनून |
.
......भाई भाई करत, चीनने सुरा खुपसला पाठी,
......चीन युद्धाची गोष्ट ऐकतांना, आवळतात मुठी |
.
विश्वासघातकी चिन्यांना कसा शिकवला धडा,
शेवट ऐकतांना मात्र, डोळ्याच्या ओल्या कडा |
.
.....भारत पाक युद्धाच्या, कथेची लज्जत छान,
......विजयी वीरांमुळे, आमची ताठ मान |
.
स्वातंत्र्यलढ्याची आठवण आजोबा मनात जागवतात,
सैनिक बनून लढायचे, स्वप्न सा-यांना देतात |
.
.
( सौ. शैलजा शेवडे )
Comments