किती वाहसी, खुळ्या मना रे, ओझे सारे, भुतकाळाचे,

आठवणीचे, अपमानाचे, शल्याचे अन दुखावल्याचे,

खुशाल टाकुन दे सारे ते, म्हण तू आणि मुक्तमनाने,

उच्चरवाने, आनंदाने, ’ गंगार्पणमस्तु, सारे गंगार्पणमस्तु ।
.
.
आठव क्षण ते आनंदाचे, फुले झेलल्या धुंद मनाचे,

तरारल्या त्या अंकुराचे, मोहरलेल्या चैत्रबनाचे,

करून अलविदा पाचोळ्याला, म्हण तू आणि मुक्तमनाने,

उच्चरवाने, आनंदाने,’गंगार्पणमस्तु सारे, गंगार्पणमस्तु ’ ।
.
.
समईच्या त्या मंद प्रकाशी, देवघरातील प्रसन्नतेशी,

नाळ ही जुळता चिरंतनाशी, खंत कशाला हवी उराशी,

डंख विखारी फेकून देऊनी, म्हण तू आणि मुक्तमनाने,

उच्चरवाने, आनंदाने, ’गंगार्पणमस्तु, सारे गंगार्पणमस्तु ’ ।
.
.

(सौ. शैलजा शेवडे)
.

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?