सुंदर हो जगणार आम्ही
कोसळू दे आभाळ धरेवर,
खुशाल येवो, प्रलय भयंकर,
भीती दाखवो, वादळवारे,
लुप्त होऊ दे, नभीचे तारे,
जीवनगाणे तरीही आम्ही,आनंदे गाणार..
सुंदर हो जगणार, आम्ही सुंदर हो जगणार...!
.
जीवन वाटो, कधी नंदनवन,
भासो कधी वा, जरी रणकंदन,
चुकतील किती ते, जरी पडताळे,
हसतील छद्मी, प्रश्न निराळे
मा्णसातल्या देवपणाची खात्री ती धरणार,
सुंदर हो जगणार, आम्ही सुंदर हो जगणार...!
.
काळ टाकू दे नवी प्रमेये,
सुटतील तरी ना अमुची ध्येये
येऊ देत त्या, किती अडचणी,
मार्ग काढू हो, तरीही त्यातुनी,
तो पाठीशी राम उभा जर, भीती कशी असणार?
सुंदर हो जगणार, आम्ही, सुंदर हो जगणार ।
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
Comments