अजून बाकी..!

सांगायचे तुला रे, आहे अजून बाकी,
ती वेदना कधीची, राहे अजून बाकी ।

मी स्पर्शिली कितींदा, अस्पष्ट सीम रेखा,
वेडेच व्हावयाचे, पाहे अजून बाकी ।

मृत्यु कधी पुकारी, दावी प्रलोभने ही,
खेचून जीवनाशा, आहे अजून बाकी ।

ती ओढ अंतरीची, रोखू कुणी शके का?
अव्यक्त वाटते जी, राहे अजून बाकी ।

सोसून सर्व झाला, उपहास तो जगाचा,
का सोस आसवांचा, आहे अजून बाकी ।

ते मौन जीवघेणे, बेभान आर्जवे ती,
काळोख तो जरासा, वाहे अजून बाकी ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?