मी गंधमयी वसुंधरा....

मी गंधमयी वसुंधरा,
जीवनाची सदा आसक्त,
आकाशतत्व तू जणू
निराकार निरासक्त!
मी भिल्लीण मी सती,
मी शिवाची पार्वती,
जोगी तू, बैरागी,
बैसलास समाधिस्थ ।
मी हसते,फुलते,
मोहरते,कधी रडते,
उसळते,उमलते,
कधी उन्मळून पडते।
तू तटस्थ, त्रयस्थ किनारा,
अन मी,घोंघावत,गर्जत,
लाट बनून आदळते।
गुंत्यातून मुक्त तू,
तू अविकारी, तू यती,
मोहमायी गुंतले मी,
कोठली कशी गती?
जिंकण्यास तुज परंतु,
फिरुन जन्म ते किती?
हार अन जीत ही,
खुंटली इथे मती ।
(कवयित्री: सौ शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?