संगत सोडूनी जाऊ नको रे......

संगत सोडूनी जाऊ नको रे,
आता कुठे जरा रंगत आली,
उठू नको रे,असा मधून,
आता कुठे सुरू पंगत झाली।
असा अवेळी आलास दारी,
कुठले देणे,कशी उधारी,
गुंतत गुंतत ह्र्दय जाई,
दुःख की आनंद,कोडी ही सारी।
शरीर माझे,मनही माझे,
अनोखे भाव आले कुठून?
पाऊल तुझे जरा वाजले,
काहूर कसे आले दाटून।
सगळे संपले वाटता वाटता,
कुठलं पाखरू घेई लकेर,
अल्लड होऊन हुल्लड करू,
खुशाल कुठून बघू दे हेर।
आताच होतं निरभ्र सारं,
आली कुठून बेभान सर?
भिंगो-या भिंगो-या करीत भिजू,
कुठली जादू,कसा मंतर!
कुठलं रोप? कधी रुजलं?
अनोख्या फुलांनी कधी सजलं?
किती ते प्रश्न! काय उत्तर?
धुंद गंधाने, रचू गझल!

कवयित्री:सौ। शैलजा शेवडे

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?