केशवा, पुरुषोत्तमा,


.
पुरुषोत्तम मास...अधिकमासाचं, मलमासाचं , धोंड्यामासाचं हे   किती सुंदर नाव ...अधिकमासात पुरुषोत्तमाचं स्मरण करायचं...त्याची उपासना करायची..त्या शांताकाराची , शेषशायी विष्णूची , पद्मनाभाची उपासना करायची... त्या मेघवर्ण सर्वव्यापकाची प्रार्थना करायची..   तोच भवभयहारी आहे .
हे मना, निश्चय कर, हा  अधिकमास मी सार्थकी  लावेन..
त्या मर्यादा पुरुषोत्तमाचे , रामाचे ,
स्मरण, चिंतन करेन . मानवी आयुष्यात ज्याने आपल्याला सर्वोच्च आदर्श घालून दिले, त्याला अनुसरेन.. आपली वागणूक तशी कशा प्रकारे करता येईल, याचा अभ्यास करेन  ...त्या ध्येयाप्रत जाण्याचा मनापासून प्रयत्न करेन ..आपल्या मनात आत्माराम जागवेन .......वंद्य आम्हाला दशरथनंदन रावणभंजन श्रीराम, दिनानाथ जो पूर्णप्रतापी, रघुकुलतिलक श्रीराम....राम राम गातांना हृदय हृदय, बिंदू बिंदू जोडेन.
त्या पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे पूजन करेन  श्रीराम हा मर्यादापुरुषोत्तम, तर कृष्ण हा लीलापुरुषोत्तम आहे..त्याच्या लीलांचे चिंतन करेन.. जेव्हा जेव्हा अधर्म बळावतो, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी , धर्माची परत एकदा नीट स्थापना करण्यासाठी परमेश्वर कसा अवतार घेतो, ते स्मरेन ...श्रीकृष्णाच्या परम आनंद देणा-या लीला गाईन , वाचेन  ऐकेन ..भगवद्गीतेचा  अभ्यास करेन.. ...!
उपासना करून मन, आचरण तर शुद्ध ठेवेनच, शिवाय  दानी वृत्ती मनात बाळगेन...जगावर आलेल्या या संकटात गरीब गरजू लोकांना  माझ्यापरीने मी मदत करेन, 

अंतरीच्या ईश्वरा योगेश्वरा हे,  यदुवरा,
सर्वदर्शी  सर्वसाक्षी, सत्यधर्मा  श्रीधरा  |
.
सर्वव्यापक  निर्गुणा  रे देवकीच्या नंदना,
वंदितो रविलोचना  , विरोचना  हे  वसुमना | 
.

मुरलीधरा  दामोदरा हे, अच्युता नारायणा,  
भाव दे  संकीर्तना  ,आवर्तना   हे नंदना |
.
पद्मनाभा लोहिताक्षा, केशवा पुरुषोत्तमा,
हे शिवा, हे अव्यया रे,   भक्ती दे, त्रिविक्रमा |
.
भक्तवत्सल वीतभया , हे चक्रपाणि जगदिशा 
अहंभाव जाऊ दे मम  , हे विभू रे व्यादिशा |
.
परब्रह्मा, परंधामा, पूर्णपुरुषा , शाश्वता,
स्वयंरूपा, स्वयंप्रकाशा, वंदितो, तुज अमृता |
.
.
(सौ. शैलजा भा. शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?