वनातील क्रीडा
.
भगवान श्रीकृष्णाचे रानावनातील नाना खेळ, वनभोजन, हजारो वर्षं भक्तजनांचा आनंदाचा ठेवा होऊन राहिले आहेत. श्रीमद्भागवतात या क्रीडांचं बहारदार वर्णन आलं आहे. त्याचा मराठी काव्यानुवाद
.
'चला सौंगड्यांनो, वनी आज जाऊ '
अहा गोड ती साद घाले मुरारी |
निघाली सहर्षे त्वरे गोपबाळे,
सवे गोधनाच्या , नदीच्या किनारी |
.
गुरे वासरे सोडली ती चराया, ह
री संगती तो सुरू खेळ झाला,
फुलांनी, पिसांनी ,किती पल्लवांनी
अलंकारती गोपबाळे स्वतःला |
.
किती खेळ ते मौज चाले किती ती,
लपे तो हरी रे, वनी कोण गाठी |
'पळा रे पळा, कोण स्पर्शील त्याला?
बघा मीच आधी, बघा मीच आधी | '
हरी वाजवी बासरी ती लयीने,
कुणी शिंग फुंकीत हासे मजेने |
कुणी एक भुंग्यासवे गीत गाई,
कुणी कोकिळाला उगा साद देई |
.
कुणी हंस होऊन डौलात चाले,
कुणी पाखरांच्याच छायेत धावे |
बकासारखे लावते ध्यान कोणी,
कुणी नाचतो गोप मोरा प्रमाणे |
.
धरूनी कुणी शेपटी मर्कटाची,
चढू पाहती वृक्ष, फांदी वरूनी |
उड्या मारती माकडासारख्या त्या ,
कुणी दावती वाकुल्या त्या हसूनी |
.
नदीच्या प्रवाही बुडी मारती ते,
छबीला बघूनी कुणी हासती ते,
कुणी घालती साद,मोठ्या ध्वनीने,
घुमे नाद तेव्हा ,तया मौज वाटे |
.
परब्रह्म सौख्य, असे ज्ञानियांचे ,
परं दैवत, जे असे साधकांचे
अशा बाळकृष्णासवे खेळ ज्यांचे,
किती पुण्य मोठे अहा बालकांचे |
.
तपे ती करीती, मुनी सिद्ध योगी,
न प्राप्य तरी पायधूली जयाची,
समोरी सदा तो, असे कृष्ण ज्यांच्या,
नसे तोड भाग्या, व्रजाच्या जनांच्या ||
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
Comments