राममय व्हावी  ही काया..


रोम रोमी झंकार उठे तो,  नाद  घुमे श्रीराम,
काया ही जाहली अयोध्या, जयघोष तो श्रीराम |
.
उल्हास आगळा, हर्ष आगळा, सोहळाच  श्रीराम,
स्वप्नपूर्तीचे क्षण हे आले, उत्सुकता श्रीराम |
.

प्रतीक्षेची गोडी आगळी, लहर लहर श्रीराम,
स्वागतात्सव रांगोळीही, रंगरेघ   श्रीराम |
.
एक नवी सुरुवात सुंदर,  पहाटही  श्रीराम,
नवीन किरणे भाट जाहली, गाताती  श्रीराम |
.
पणत्या ही त्या  प्रभूनामाच्या, लावियल्या श्रीराम,
ज्योतिर्मय होऊनी येतील , आता आत्माराम |
.
केवळ सुंदर प्रतीक्षा...कधी येतील श्रीराम?  ही विरहव्याकुळ वेदना ही अतीव सुंदर आहे..कारण खात्री आहे श्रीराम प्रकटणार आहेत. हे शरीर जणु अयोध्या नगरी झाले आहे... रामजपाने  भूमिपूजन झाले आहे..साधना झाली आहे..  जणु मंदिर  तयार झाले आहे.... मूर्तीस्थापना झाली  आहे. प्राणप्रतिष्ठा बाकी आहे......या शरीराचा कण कण आतुर झाला आहे...खरंच कधी होईल आत्मारामाचा साक्षात्कार?
एकदा का आत्माराम प्रकटला, की रामराज्य येईल....राम म्हणजे सच्चिदानंद ...बोलण्यात, लिहिण्यात कृतीत राम येईल..आनंद येईल..हृदयात आनंद..तर मग वाईट विचार , दुष्ट विचार येणे शक्यच नाही...राम म्हणजे प्रकाश.......! एकदा  आत्माराम प्रकटला, की सगळा अंधार, भीती, चिंता दूर होईल. भवाचे भय दूर होईल...वर्तमानातील चिंता, भविष्याची काळजी..या अवघड परिस्थितीत कसं रहाणार आपण? ही भीती दूर होईल...एकदा मनात ही खात्री आली, ना कोरोनाचे भय रहाणार..ना मृत्यूचे भय रहाणार....!तुझ्यातही राम, माझ्यातही राम.....जिवाजिवातील मैत्र  वाढणार...सद्विचार वाढणार...!

संकल्प आगळा पेशी पेशीतून , एकच हा श्रीराम,  
राममय  व्हावी ही काया , आर्तता श्रीराम.....!
.
(सौ. शैलजा भा. शेवडे )
.

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?