श्रीगणेश ब्रह्मणस्पती ...

.

श्रीगणेश ब्रह्मणस्पती, वर्णाया उत्सुक मती,

धडपडती शब्द किती, गणपती दे, बुद्धीस गती |

जितकं तुझ्याबद्दल वाचावं, ऐकावं, आनंद तर देतंच ते..पण मनात संभ्रम निर्माण होतो, नेमका आहेस तरी कसा तू ..एकदंत, लंबोदर, शूर्पकर्ण वक्रतुंड गजमुख हे रूप मनास मोहित करतंच..हे सगुण सुंदर रूप तुझं वर्णन करतंच ..पण त्याचवेळी अथर्वशीर्षातील त्याचे वर्णन सांगते, ‘गणपती केवळ तुमच्यासाठी सगुण साकार झालायं बरं का...! खरं तर श्रीगणेश, ब्रह्मणस्पती तो निर्गुण निराकारच..!’

गणपतीला प्रत्यक्ष तत्त्व म्हणले आहे.. तो जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे.. गणपती खरोखर ब्रह्म आहे...तो चैतन्यरूप आहे, आनंदमय आहे, तो सच्चिदानंद आहे...

बाकीचं अथर्वशीर्षातील वर्णन आपल्याला माहित आहेच. मी अडखळले ते या शब्दांपाशी,

गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम् ।
अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ।
तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् ।
गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् ।
अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिन्दुरुत्तररूपम् ।
नादः सन्धानम् । संहिता सन्धिः ।
सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः ।
निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता ।
 गँ गणपतये नमः ।। ७ ।।

अर्थ- गणाच्या प्रारंभी ‘ग’ काराचा उच्चार. गण म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. तो पाय मोडलेला ग आहे.सर्व वाणीच्या आधी असलेला ‘अ’ घेतला. तो पाय मोडलेल्या ग च्या ठिकाणी ठेवला. म्हणजे पूर्ण ‘ग’ झाला. नंतर परतरः अनुस्वारः आणि त्यानंतर अर्धचंद्राकार अनुस्वाराचा उच्चार करावा.अर्धेन्दुलसितंम्हणजे अर्धचंद्राकार विलासितो तो. तारेण ऋद्धं..तार म्हणजे ओंकार. तारयति सः ओंकारः हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे.

या मंत्राचे पूर्वरूप ‘ग’ आहे. मध्यमरूप ‘अ’ आहे. आणि अनुस्वार अन्त्यरूप आहे. बिंदू उत्तररूप आहे....एक नादात्मक, एकोच्चारणातमक उच्चारण त्याला नादसंधान म्हणतात. एक अक्षरात्मक संहिता असते, एक नादात्मक संहिता असते. ही गणेशविद्या आहे.गणेशविद्या प्रदान कराणारा हा गणक ऋषी आहे. छंद निचृतगायत्री आहे. या सुक्तामध्ये गणपती देवता आहे...

या इथे अनुस्वार झाला की परत बिंदू कशाला...बिंदूचा अर्थ काय ..या प्रश्नाने मला बेचैन केले. ब-याच जणांना मी मी माझी शंका विचारली. पण कुणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही .

बिंदू ही अध्यात्मिक संज्ञा आहे. बिंदू ही एक ज्ञानशलाका आहे. असे उत्तर एके ठिकाणी मिळाले. पण म्हणजे काय, आणि मंत्ररुपात त्याचा नेमका अर्थ काय, हे उलगडले नाही.

वाचतांना मला ‘अमृतबिंदूपनिषद’ या पुस्तकात एक संदर्भ गवसला. त्यात लिहिलं आहे,

परमेश्वराचे स्वरूप चिदानंदात्मक आहे. शक्तीही चिदानंदरूप आहे.या दोहोत शक्ती शक्तिमान यांच्याशिवाय कोणताही भेद नाही. चिद्रूप शक्तीहून भिन्न अशी परमात्म्याची अचिद्रूप शक्तीही आहे. तिलाच बिंदू असे म्हणतात. हिचेच दुसरे नाव महामाया हेच चिदाकाश म्हणतात.

बिंदू ज्योतीस्वरुप आहे.या बिन्दुरूप ज्योतीमध्ये समग्र विश्व अभिन्नरुपाने भासमान होत असते. प्रणवाच्या  अकार, उकार, मकार या तीन अवयवानंतर चतुर्थ  बिंदू आहे.

बिंदूनंतर नाद येतो.बिन्दुरूप ज्योतीमध्ये अर्थाचा साक्षात्कार होतो, त्याचप्रमाणे नादात निखील विश्वाचा, अनंत वाचकांचा, अनंत मंत्रांचा साक्षात्कार होतो. त्यामुळे कोणताही मंत्र चेतन झाल्यावर नादाच्या अवस्थेत परिणत होतो. 

 

गणेशाला आपण सिद्धीबुद्धीपती म्हणतो..कुणाला वाटतं, सिद्धी, बुद्धी या गणपतीच्या दोन पत्नी  आहेत. पण तसे नाही.. मुद्गलपुराणात सांगितलं आहे,...आत्ममाया किंवा योगमाया दोन प्रकारच्या शक्तींनी युक्त असते.पहिली शक्ती, ज्ञानशक्ती , हिलाच महाबुद्धी म्हणतात. दुसरी शक्ती बुद्धीला होणा-या ज्ञानाला अनेक संभ्रमात टाकत ज्ञानाच्या स्वरूपात विकल्प निर्माण करणारी शक्ती.ती अनेकाविधाता दाखविते. त्याच्या स्वरूपाचे असंख्य पर्याय आपल्यासमोर ठेवते.या शक्तीलाच महासिद्धी म्हणतात.

श्रीसिद्धीने श्रीबुद्धीस मोह घातल्याने देहाची निर्मिती होते.आणि मग त्या बिन्दुरुपास देही म्हणतात. मूळ शुद्धरुप परब्रह्म गणनाथ जेव्हा आत्ममायेशी युक्त होतात,

तेव्हा त्या मायामय रुपास बिन्दुरूप म्हणतात. चैतन्यरूप हे बिन्दुरूप आणि बहुविधाप्रकटीत देहीला बहुरूप म्हणतात. वेदांतशास्त्रात या बहुरुपासच त्वं आणि बिन्दुरुपास तत म्हणतात. देहात आसक्त जीवात्म्यास त्वं म्हणतात. आणि उपाधिरहित चैतन्यास तत म्हणतात. आणि त्या मूळ चैतन्यापासून ‘तू भिन्न नाहीस’ हे सांगणारा महोपदेश असतो, ‘तत्त्वमसि’’’

किती वेगळा आहे बिंदूचा अर्थ...जितका अभ्यास करावा, तितका थोडाच..! अल्पमतीला इतकंच कळतं,

‘गणेशा, तू सगळीकडे व्यापून राहिला आहेस..देहात तू बिन्दुरुपाने स्थित आहेस...! हे आकाशरुपा तुला वंदन असो..

 

 

. प्रथम तुला नमितोस्मरतोगणराज गजानन विघ्नहरा,
भवभयतारकहे गणनायकसंकटनाशक सौख्यकरा ।
सकलचराचर व्यापकधारक पालक पोषक पाशधरा,
कणकण होत विलीन तुझ्यातफिरून तुझ्यातुन जन्म खरा ।
.
.
सगुण कुणी तुजला म्हणतीपुजतीभजतीव्रत आचरती,
गजवदना तव रूप मनोहररेखित मानस तोषवती ।
प्रमथपते अति गूढ अनादि अपार गुणेश तुला वदती,
प्रणवरुपात तुला बघतीतरती भवसागर अल्पमती ।
.
.
तगमग ही हृदयात क्षणोक्षण जाण दयाघन श्रीवरदा,
पदकमलावर जीवन अर्पणदे मज दर्शन शांतिप्रदा ।
गजमुख श्रीगणनायक तारक ध्यास तुझा मज भास सदा,
अविरत चिंतन ध्यान गजानन वंदन वंदन मोक्षप्रदा । 
.
.
.

सौ. शैलजा भा. शेवडे

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?