चरैवेति चरैवेति
.
चरन् वै मधु विंदति चरन् स्वादुमुदंबरम।
सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तंद्रयते चरंश्चरैवेति।’
ऐतरेय ब्राह्मण मधील चरैवेति चरैवेति या ५ सुक्तांनी किती जणांना प्रेरणा दिली आहे...चालत रहा...चालत रहा..
.
चरैवेति, चरैवेति सदा चालत रहा रे तू,
गतिशीलता तुझी ओळख, सदा चालत रहा रे तू |
.
नसे अस्तित्व काही ते, तुझ्या त्या भूतकाळाला,
उडालेली असे धूळ ती, आणि नुसताच पाचोळा ,
नको अडकू, नको थांबू , सदा चालत रहा रे तू,
चरैवेति, चरैवेति, सदा चालत रहा रे तू |
.
तुझी पावले फुले होतील ,चालता चालतांना ती
चेतनेच्या डहाळीला फळे मग , चालतांना ती,
निघून जातील दुष्कर्मे ,श्रमानेच ती, पहा रे तू,
चरैवेति चरैवेति सदा चालत रहा रे तू |
.
जरी करशील आळस तू, भाग्य ही, मग निजेल ते,
करशील संकल्प चलण्याचा, भाग्य होईल जागे ते ,
निरंतर चालतांना ते, भाग्य दे साथ , पहा रे तू,
चरैवेति चरैवेति सदा चालत रहा रे तू |
.
कलियुग ते जणू काही , असे निष्क्रिय जेव्हा तू,
असे द्वापार युगच ते, उठशील आणि जेव्हा तू,
अवतरेल, त्रेता आणि सत्ययुग ते, चालतांना तू,
चरैवेति, चरैवेति, सदा चालत रहा रे तू |
.
गतीशीलास फळे मिळती, गतीशीलास मधू मिळतो ,
बघ सूर्यास आकाशी, अविरत भ्रमण कसा करतो,,
असे आदर्श तुझा पथिका, तोची सूर्य हे जाण रे तू,
चरैवेति चरैवेति सदा चालत रहा रे तू |
.
चरैवेति ..हा शब्द गौतम बुद्ध उपदेश करतांना सांगायचे...अथक परिश्रम करा..चालत रहा...खरोखर आपला आदर्श सूर्य आहे..जो सतत चालून आपल्याला प्रकाश देतो, आरोग्य देतो, ऐश्वर्य देतो...नदीचा प्रवाह वाहता असतो..अनेक खडकांना फोडून पुढे जातो...आपल्याला निर्मल जल त्यामुळे मिळते.
.
खरोखर जे सदा गतीशील असतात, कार्य करत रहातात, प्रयत्न करत रहातात, त्यांच्यावरच लक्ष्मी प्रसन्न होते....आपण म्हणतोच, 'थांबला तो संपला.. ' आळसात वेळ वाया घालवू नका...कितीही अडचणी येवोत, प्रयत्न सोडू नका..भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा... ! विवेकानन्दही म्हणतात, 'उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत | आपला मंत्र हाच समजा..उपासना हीच समजा...सतत कार्यरत रहा...चालत रहा...चलैवेति..चलैवेति..
.
(सौ. शैलजा शेवडे )
Comments