आजच्या लोकमत च्या अध्यात्मिक सदरातील माझा सहभाग.

.
वनभोजन
.
कृष्णाचे रूप मनोहर, त्याच्या लीला ही अति मनोहर...! गोकुळातील सर्वांचा अतिप्रिय कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गाई चरायला वनात घेऊन गेला..तिथे खेळ खेळले..नंतर सगळे जेवायला बसले . प्रत्येकाने आपापली शिदोरी काढली. भोजनपात्रे तर झाडांच्या पानांची, सालींची तयार केली होती. कृष्णमय झालेली सर्व मंडळी..कृष्णाच्या भोवती रिंगण करून जेवायला बसली..कृष्णही प्रत्येकाला घास देत आहे...किती सुंदर दृश्य...!
.
.
मनमोहन तो, मधुसूदन तो, मधुभाषक तो, म्हणतो सकला,
.
"यमुनातट हा, रमणीय अहा , मऊ वाळुत या, इकडेच चला |
.
फुलली कमळे, जळ निर्मळ हे, घनदाट किती , तरू ते इथले,
.
गगनात थवे, खग सुंदर हे , वन गंधित हे, मनही रमले |
.
.
जल प्राशुनिया, मग गोधन हे, चरतील तिथे हिरव्या कुरणी,
.
अन आपणही, करु भोजन ते , जवळीच इथे अति रम्य वनी |
.
रवि ही अगदी वर येत, असे अन लागतसे मग भूक किती "
.
मुरलीधर तो, हसुनी वदतो, मग गोप हसून च 'हो' म्हणती |
.
.
घनश्याम मध्ये , अवती भवती , बहुमंडल ते सगळे करती,
.
मनमोहन तो नजरेत हवा, बसती म्हणुनी हरिसन्मुख ती |
.
अरविंदच सुंदर ते फुलले , नलिनी दल ते जणु गोप गमे ,
.
मुरलीधर शोभत कोशच तो, वन सर्व च ते खुलते, डुलते |
.
व्रजबालक ते ,मग हर्षभरे, चव दाखवती प्रिय त्या हरिसी,
.
मग देत स्वभोजन, ते इतरा, अन खात स्वतः अति हर्षित ती |
.
भरवी मनमोहन घास तयां , हरिरूपच ते मग गोप किती ,
वनभोजन हे अतिदिव्य असे, मग देवच विस्मय ते करती |
.
कटीवस्त्रामध्ये वेणु आणिक , वाम कक्षी ते शिंग नी वेत्र
मोरपिसांचा मुकुट मस्तकी, कमळासम ते मोहक नेत्र,
.
गोपबालकां प्रेमे देण्या, दहीभाताचा घास करतळी ,
हृदयी माझ्या अखंड राहो, मुरलीधराची मूर्त सावळी |
.
.
सौ. शैलजा भा. शेवडे
.

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?