अनंता, हेरंबा, गणपति, गणेशा, गजमुखा,
कृपेच्या मेघा रे, नमन तुजला हे शिवसुता |
.
अथर्वा, विघ्नेशा, सुमुख प्रणवा, मंगलमया,
अमेया जावो दुर्गुण, मम अहंकार विलया |
.
गणाधीशा ही एकच विनवणी ,दे रस नवा
असीमा, येऊ दे तव निखळ रूपा अनुभवा |
.
अमोघा, ओंकारा, तव स्मरण राहो नित मना,
अरिष्टे जावू दे, सकल, कपिला ,दे सुख जना |
.
हिरण्यरूपा दे शुभ मति विवेकी मज अता
विधात्या, जावू दे तिमिर, उजळो जीवनकथा |
.
.
सौ. शैलजा शेवडे
Comments