शूर्पणखा
शुर्पणखा....
.
श्यामलवर्णी, कमललोचनी, तपस्वी सुंदर,सुकुमारावर,
शुर्पणखा भाळली, राक्षसी रामावर भाळली |
.
सुमुखी रामावर ती दुर्मुखी, सुलोचनावर ती विरूपाक्षी,
मृदुभाषीवर कर्कश्या ती, काममोहित जाहली,
राक्षसी रामावर भाळली |
.
बोले भयंकर उग्र राक्षसी , 'कोण असे तू तरुण तापसी?
आला कुठूनी भार्येसह या , निबिड अशा जंगली ?
राक्षसी रामावर भाळली |
.
'राम बोले, पितृ आज्ञे , आलो येथे सीतेसंगे ,
बंधू माझा हा लक्ष्मण , माझी जणू सावली |
राक्षसी रामावर भाळली |
.
महाबलाढ्य दशाननाची , भगिनी मी परी
पाहताक्षणी तुला कशी ती, प्रीत मनी जागली,
राक्षसी रामावर भाळली |
.
पाहताक्षणी तुला उत्तमा, आकर्षित मी झाले रामा,
प्राणनाथच तू माझा, मी खूण मनी बांधली
राक्षसी रामावर भाळली |
.
मी स्वच्छंद बल गामिनी ,तू धनुर्धारी वीर पराक्रमी,
भ्रतार, हो माझा तू, फिरू मुक्तपणे त्रिस्थळी ,
राक्षसी रामावर भाळली |
नाही शोभत तुला अशी ही, कृशोदर अशी कुरूप भामिनी,
त्याग तिला, हे महान वीरा, सुंदर जोडी अपुली ,'
राक्षसी रामावर भाळली |
.
'खाते मी तव विजोड भार्या, आणि तुझ्या या बंधूला पण
मुक्त तू अन मुक्त मीही , मौज करू जंगली,'
राक्षसी रामावर भाळली |
.
राक्षसीचे प्रेम राक्षसी, प्रेमाची ती रीत राक्षसी,
क्रूरपणे सीतेला ती, भक्षाया धावली,
राक्षसी रामावर भाळली |
आज्ञेने रामाच्या मग, खड्ग उपसून लक्ष्मणाने ,
नाक कान कापून , विरूपा तिज केली,
राक्षसी रामावर भाळली |
.
.
(सौ. शैलजा भा. शेवडे)
.
Comments