सांग रे उद्धवा
सांग रे उद्धवा...
.
कृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला...श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता,.त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दुःखी झालेल्या मातापित्यांना,कुशल सांग,गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर. असे सांगितले.उद्धवाने तसे केले,तेव्हा,गोपी उद्धवाला म्हणाल्या,
'सांग,रे उद्धवा, स्मरतो का कृष्ण कधी,,
वृन्दावनां आणि अम्हां, ग्राम्यगोपिकांना,
मथुरेत जाऊनीया,वाटतो जणु विसरला,,
येईल का फिरून कृष्ण,सांग रे आम्हांला |
शरद रात्र, पूर्णचंद्र,कुमुद गंध दरवळला,
कृष्णगान,ते मुखात,नुपुरनाद रुणझुणला,
वृंदावन,रासक्रीडा, स्मरते का कधी त्याला,
येईल का, फिरून कृष्ण, सांग रे आम्हांला |
.
ग्रीष्मातील शुष्क वन,म्लान आम्ही कृष्णाविन
कृपाकटाक्ष संजीवन, सळसळेल,देही प्राण,
गोविंद,हा,मंत्रच तो, देहांत या किती घुमला,
येईल का,फिरून कृष्ण, सांग रे आम्हाला |
.
घेऊन येई गाईंना, चरावया या इथे,
खेळत,गोपांसह,भूमीवर या इथे,
वेणुनाद घुमतसे, तीरावर या इथे,
श्रीनिकेतन पावले, उमटली या इथे,
व्याकुळ अम्ही,स्मरतो रे,पुन्हा पुन्हा कान्ह्याला,
येईल का फिरून कृष्ण,सांग रे आम्हांला |
.
सांग कसे विसरू आम्ही, सुंदर ते चालणे,
मनमोहक हास्य आणि मधुर ती भाषणे,
हरवलो अच्युतात जणु, अशा स्वतःला,
येईल का फिरून कृष्ण,सांग रे आम्हांला |'
.
'कृष्ण कृष्ण' करत गोपी बेभान पुन्हा जाहल्या,
कृष्ण इथे, कृष्ण तिथे,प्रार्थना करू लागल्या,
'हे नाथ,रमानाथ,व्रजनाथ,दुःखनाशका,
दुःखसागरी,गोकुळ बुडे,वाचव रे आम्हांला |'
.
(सौ.शैलजा भा. शेवडे)
Comments