भोगतृष्णा
डॉ. सिग्मंड फ्रोईड,जागतिक स्तरावरचे मानसशास्त्रज्ञ. त्यांचा सिद्धांत,' 'काम' हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे...पण आपले सामाजिक नियम , बंधने यामुळे कामवासना दाबून टाकणे भाग पडते. .पण हे चुकीचं आहे. नैतिक , धार्मिक कल्पना झुगारून त्या जागी नव्या नीतीची स्थापना केली पाहिजे. कामवासना नीट, व्यक्त, संचालित आणि तृप्त करणे.हे एकमेव ध्येय पाहिजे. '
पण खरंच शक्य आहे का? कामवासना भोग देऊन तृप्त होतील का कधी?
.
.भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला याबद्दलच विचारतो,
.
'सांग मला रे, हे हृषीकेशा, का जन पापे करती?
कुठली प्रेरणा बळजोरी ती, भाग तया पाडिती ? '
.
योगेश्वर अन तत्त्वदर्शी जे हृदयकमली राहती,
श्रीकृष्ण भगवान अर्जुना समजावून सांगती |
.
'जाणून घे तू , ती प्रेरणा जी भोगाची तृष्णा,
रजोगुणातून उद्भवलेली अधाशी कामवासना |
.
तृप्तीच्या मार्गात जर का अडथळे येती,
धारण करते रुप क्रोधाचे , वैरी खरोखर ती |
.
अग्नि धुराने, धुळीने आरसा आच्छादिला जातो,
अथवा गर्भ वारेने जसा गुरफटला जातो |
.
कामरूपी जो अग्नि , भोगे कधी न तृप्त होतो,
नित्यवैरी तो हे कौंतेया, ज्ञानास तसा झाकतो |
.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात, 'अग्नि स्वरूपतः प्रकाशमान पण धुराने झाकला जातो. आरशावर धूळ बसल्यावर त्यात आपले रूप दिसत नाही. तसंच, भोगतृष्णेने आपण कोण हे ज्ञान आपल्याला होत नाही.. आपले अंतःकरण मलिन झाल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळत नाही..म्हणजे आपलयाला आपले खरे रूप जाणता येत नाही....'
काय आहे आपले खरे रूप? डॉक्टर सिग्मंड फ्रोइड म्हणतात तसे आपले खरे रूप म्हणजे कामवासनेचे भेंडोळे आहे का? भोगतृष्णा हीच आपली मुलभूत प्रेरणा आहे का? तर अजिबात तसे नाही..उलट तिला भगवंतांनी वैरी समजले आहे...तिच्यावर काबू मिळवता येतो. भोग घेण्यासाठी केविलवाणे धडपडणे हीच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता नाही..
म्हणून भगवान सांगतात,
.
नियमन कर तू इंद्रियांचे भरतश्रेष्ठ अर्जुना,
नष्ट कर तू हे कौंतेया, पापरूपी कामना |
.
आपल्या धर्माचं हेच वैशिष्ट्य आहे.....प्रत्येकात परमेश्वर आहे..परमात्म्याचा आपण अंश आहोत, आपण आनंदरूप आहोत , ही जाणीव, हे ज्ञान आपल्याला इंद्रियांचं नियमन करून मिळू शकतं..सिग्मंड फ्रोईड म्हणतात, तसे आपण केवळ स्वार्थी, कामाने बरबटलेले, पण वरकरणी सोज्वळतेचा आव आणणारे नाहीत.. तर इन्द्रियांवर ताबा मिळवून भोगतृष्णेवर विजय मिळवला की आपले चिदानंद रूप समोर येते...आपण तेच आहोत.
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
Comments