बाळरूप ते, परमात्म्याचे.....

बाळरूप ते, परमात्म्याचे......
.
कार्तिक.महिना...याला`दामोदर मासही म्हणतात.कृष्णाला प्रिय असलेला महिना..कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करण्याचा,ऐकण्याचा महिना..वात्सल्यरसात,भक्तीरसात भिजून जाण्याचा महिना...! परमात्म्याचे बाळरूप मनोमन आठविण्याचा महिना...!
.
गोजिरवाण्या मुठीत धरुनी, गोजिरवाणे पाय चिमुकले,
मुखी घालतो बाळकृष्ण तो, गोड असे ते किती सानुले,
वटपत्रावर पहुडलेले, शिशु मनोहर आनंदाचे,
हृदयी माझ्या अखंड राहो, बाळरूप ते, परमात्म्याचे |
.
जावळात त्या,कुरळ्या, कुरळ्या,मोरपीस ते खोचलेले,
काजळ भरले नेत्र आणखी,पायी मंजुळ घुंगुरवाळे,
नवनीताने माखलेले,वदन यशोदालाडक्याचे ,
हृदयी माझ्या अखंड राहो, बाळरूप ते परमात्म्याचे |
.
....एकदा.यशोदा.कृष्णावर रागावली.त्याला उखळाला बांधू लागली.....
.
आदी नाही, अंतही नाही, आदिपुरुषाला,
आंतर नाही, बाह्यही नाही, सर्वव्यापकाला,
रूप गोजिरे घेतलेल्या, अव्यक्त अरुपाला,
बांधते,हरीस उखळीला,यशोदा कृष्णकन्हैयाला |
.
खोड्या करुनी सतावतो,ऐकत मुळी नाही,
थांब ठेवते, तुला बांधुनी,हलायचे नाही,
दोन बोट तरी,अपुरी दोरी,गोपी हसू लागल्या,
बांधते,हरीस उखळीला,यशोदा कृष्णकन्हैयाला |
.
अर्जुनवृक्षांच्या मधुनी, दामोदर गेला,
उखळ अडकले,बळे ओढले, कडाडध्वनी आला,
वृक्ष उन्मळूनी कोसळतांना,चमत्कार झाला,
सिद्ध पुरुष ये, त्यांच्यामधूनी,वंदिती कृष्णाला |
.
अग्नीसम तेजस्वी कांती, प्रकाशल्या दशदिशा,
पुन्हापुन्हा वंदिती,मग ते,कृष्णपरमपुरुषा,
'शापित आम्ही,कुबेरपुत्र,दर्शनयोग आला,
परममंगला,तुझ्यामुळे रे,स्वर्ग पुन्हा पातला |'
.
बांधते,हरीस उखळीला,यशोदा कृष्णकन्हैयाला |
...
त्या बालरूपातील परमात्म्याला परत परत नमस्कार........!
.
(सौ.शैलजा भा.शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?