भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥

भव शङ्कर देशिक मे शरणम्
.
विदिताखिलशास्त्रसुधाजलधे
महितोपनिषत्कथितार्थनिधे ।
हृदये कलये विमलं चरणं
भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ 1
.
हे परमगुरु, (आदि शंकराचार्य)
आपण सर्व गहन शास्त्र जाणणारे , ज्ञाता आहांत, आपण उपनिषद प्रतिपादन कर्ता आहांत, माझ्या हृदयात आपले अत्यंत विमल असे चरणकमल पूजले जातात. हे श्रेष्ठ गुरु, मी तुम्हाला शरण आलो आहे...मला आश्रय द्या.
..आचार्य शिष्य तोटकाचार्यांनी काढलेले हे उद्गार ....! ज्याची अडाणी, याला काही कळत नाही, अशी हेटाळणी होत होती..पण जो गुरुसेवेत अत्यंत रत होता, त्याच्यावर आचर्य शंकरांनी कृपा केली, आणि त्याच्या मुखातून भक्तीरसात ओथंबलेलं पण वृत्तात रचलेलं असं सुंदर काव्य बाहेर पडलं...
.
आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माचे , वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. आज त्यांची जयंती.
अलौकिक प्रतिभा त्याबारोबरोबरच लोककल्याणाची तळमळ त्यांना होती.त्यांनी अखंड भ्रमण केले. , धर्मात मतमतांतरे होती..चुकीच्या गोष्टी रूढ झाल्या होत्या..सगळीकडे गोंधळ माजला होता. प्रत्येक पंथ स्वतःला श्रेष्ठ समजत होता.. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य...हे संप्रदायही स्वतःला इतरांपासून वेगळे समजत होते.....त्यात चार्वाक तत्वज्ञान, बौद्ध हेही लोकांना आकर्षित करत होते.....अशा वेळी एका संन्यासी विस्कटलेल्या धर्माची घडी परत नीट घालून देतो..धर्मात एकसूत्रता आणतो...सगळीकडे एकाच पूजापद्धत आणतो..भारताच्या चार दिशांना असलेल्या चार प्रांतात धर्मदुर्गांची म्हणजे मठांची स्थापना करतो..त्यांच्या रुपात चार वेदांचा उद्घोष सर्व जगात सुरु करतो......सगळंच अद्भुत...!
आचार्य शंकरांनी वेदान्तधर्माला विज्ञानाच्या आणि तर्काच्या सुदृढ पायावर उभे केले. वेदांत घराघरात पोचवला..ते केवळ सामान्यांना न समजणारी प्रवचने देणारे, सिद्धांत मांडणारे दार्शनिक नव्हते, तर अत्यंत सुमधुर अशी स्तोत्रे रचणारे आणि त्यामुळे जनमानसात प्रिय झालेले मंत्रदाते ऋषीच होते. त्यांची भक्ती पराभक्ती होती..ज्ञानोत्तर भक्ती होती..त्यांनी लिहिलेली विविध देवतांची स्तोत्रे आजही आपण आवडीने म्हणतो. त्यांच्याच एका स्तोत्रातला हा श्लोक,
.
अविनयमपनय विष्णो दमय मनः शमय विषयमृगतृष्णां ।
भूतदयां विस्तारय तारय संसारसागरतः ॥ १॥
.
हे सर्वांतर्यामी परमेश्वरा, माझा उद्धटपणा नाहीसा कर. माझ्या चंचल मनाला आवर घाल. मनातील अमर्याद विषयतृष्णा शांत कर. अंतःकरणातील भूतदया व्यापक होईल असे कर, संसारसागरातून मला पार कर.आणि ,
.
चिदानंदरूपः
शिवोऽहं शिवोऽहम्
.
मी चिदानंदरूप आहे..शिव आहे..हा मंत्र आमच्या हृदयात प्रतिष्ठित होवो..आम्हाला ज्ञानलाभ होवो..स्वरूपप्राप्ती होवो..!
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?