अरण्यरुदन

अरण्यरूदन

माझ्या असंख्य दालनांपैकी,

'आई' हे दालन परमेश्वरानं बंद केलं,

अर्थातच दुःख झालं,

पण बाकीची दालनं होतीच!

नंतर हळूहळू लक्षात आलं,

केवळ एकच दालन बंद झालं नाही,

तर बरीच दालनं आपोआप बंद झाली आहेत!

त्या दालनात मला कधीच जाता येणार नाही,

कारण,त्या दालनात जाणा-या वाटा,

आईच्या दालनातून होत्या..!

ती दालनं होती,निर्भेळ कौतुकाची,मायेच्या विसाव्याची,

हक्कानं लाड करून घ्यायची,

माहेरपण उपभोगायची,आणि हो,

एका दालनात माझं शैशव जपलं होतं,

एका दालनात माझं किशोरपण!

मी काढलेल्या वेड्यावाकड्या चित्रांसकट,

मी लिहिलेल्या भाबड्या कवितांसकट,

आईच त्या खुणा जपण्याचा,

हळवेपणा करू शकत होती!

ते दालनही बंद झाले,

अशी एकापाठोपाठएक दालनं बंद झाली,

मला जाणवलं वास्तव! माझं पोरपण संपलं,

माझं मूक आक्रंदन,'अरण्यरूदन' ठरलं

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?