छेडिलीस का फिरून , तार तू सतारीची,

छेडिलीस का फिरून , तार तू सतारीची,
रोखलीस का अशी, फिरून वाट दारीची?

देऊनी स्वरांगुली, आणलेस तू इथे,
भाव हा अनोळखी, शब्द जाहले मुके,
कोण तू, कोण मी, धुंदी लयकारीची,
रोखलीस का अशी, फिरून वाट दारीची ।

गंभीर आलाप ते, सागर जणू गर्जतो,
लाटातून मंदशा, षडज लावू पाहतो,
पावन ओंकार जणू, घेतसे व्योमची,
रोखलीस का अशी, फिरून वाट दारीची ।

अवखळ फिरतीतूनी, कधी गमक घेऊनी,
तान देई, मोद मना, खळखळत्या झ-यातूनी,
नंदनवनी घुमवशी, सुंदर हे स्वप्नची,
रोखलीस का अशी, फिरून वाट दारीची ।

दा दिर दा, दा दिर दा, तूच सांग जाऊ कशी?
विसरले कामधाम, सूरमोहिनी अशी,
सासुरवाशीण मी, भीड जनरितीची,
रोखलीस का अशी, फिरून वाट दारीची ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?