वनवासाला निघता राम
वनवासाला निघता राम, निरोप तो घेण्या आले,
शोकसंतप्त होई सीता , उपहासे त्यांना बोले |
.
'काय बोलणे असे आपुले, पुरुषश्रेष्ठा हे रामा,
हसूच येते, बघा मला ते, ऐकुनी सारे, हे रामा |
.
पत्नी मी तुमची, वाटेकरी मी, तुमच्या सा-या भाग्याची,
सुखदुःखाची आणि आता वनवासाच्या त्या आज्ञेची |
.
वनात जाता, तुम्ही, तर, तुमच्यापुढे जाईन आधी,
वाटेतले, दर्भ नी काटे, तुडवीन मी तुमच्या आधी |
.
प्रासादी ते नको राहणे, तुम्हांविण ऐश्वर्य भोगणे,
पतीचरणाची छाया प्रिय मज , तुम्हांसवे अन वनी राहणे |
.
हे वीरा, हे नरोत्तमा, ते ठावे मजला धर्म आचरण,
ब्रह्मचारिणी राहून हर्षे, करीन मीही कालक्रमण |
.
का घालिता भीती मजला , वनातील, त्या क्लेशांची,
पर्णशय्येवर निजण्याची, कंटकाकीर्ण त्या मार्गांची?
.
प्रिय रामा, तुमच्यासंगे ,सांगा मज भय कोणाचे?
हिंस्त्र श्वापदे, दूर राहिली, नाही भयही इंद्राचे |
.
का तुमच्या मनी मज त्यागणे, का तुम्हां शंका येते,
सूर्यासम तेजस्वी तुम्ही, सारे म्हणती, ते खोटे?
.
वनवास आहे माझ्या नशिबी, माहित आहे, हे रामा,
सांगितले हे ज्योतिष्यांनी , विवाहा आधीच मज , हे रामा |
.
वियोग तुमचा नरक तुल्य मज, स्वर्गच माझा तुमच्या संगे,
जाणून घ्या हो, प्रीती माझी ही , घेऊन जा मज तुमच्या संगे |
.
प्रिय रामा, राघवा, रघुवीरा, नको राहणे, जगणे तुम्हांविण,
घेऊन जा मजला संगे, अन्यथा, करीन मी विषाचे प्राशन |
.
.
सौ. शैलजा शेवडे
तारीख ३१ मार्च २०२०
.
.
Comments