रामा, धाव धाव आता..

आर्त जन हे तुला पुकारती,
धाव धाव आता,
रामा, धाव धाव आता
तुझ्याविणा भयभीत जनांचा
सांग कोण त्राता,
रामा, धाव धाव आता |
.
सैरभैर हे सारे झाले,
काय करावे कोणा न कळे,
अतिभयानक संकट आले,
व्यापितसे जगता,
रामा, धाव धाव आता |
.
कोण शत्रू, हा , दिसतही नाही,
समजत नाही, उमजत नाही,
अभद्र छाया पसरी वेगे,
भिववितसे चित्ता,
रामा, धाव धाव आता |
.
अहंपणातच जीव बुडाला,
विसरुनी गेला आत्मारामा,
काळ ठाकता, असा सामोरी,
सुन्न होई माथा,
रामा, धाव धाव आता |
.
रघुनायका, रक्षी सकला,
भवभय मोठे, जीवही थकला,
पुन्हा पुन्हा ही आर्त विनवणी,
पाव पाव आता,
रामा, धाव धाव आता |
.
जोपर्यंत मोठे संकट येत नाही, तोपर्यंत आपण किती फुशारक्या मारत असतो...कोण मला काय करू शकणार? मी शहाणा, मी समर्थ...पण नियतीचा एक फटकारा बसतो...आणि आपल्या यःकश्चितपणाची जाणीव होते. यम कधी अनोळखी विषाणूच्या (व्हायरस च्या ) अतिसूक्ष्मरुपात येतो.. थैमान घालतो, सगळ्या जगाला हादरवून टाकतो...... विज्ञानाच्या मर्यादा समोर येतात ..मन भयकंपित होऊन जाते...आणि शेवटी परमेश्वराच्या चरणापाशी येते..सर्वात्मक सर्वेश्वराची नावे वेगवेगळी असतील...राम, कृष्ण, विठ्ठल, शंकर, तसेच अल्ला, येशू.......पण शेवटी तो एकच आहे...! तोच खरोखर आपल्याला विश्वव्यापी संकटातून दूर नेणारा आहे....आपले आत्मबल वाढविणारा आहे. 'सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः '.....ही प्रार्थना त्याच्यापाशी आपण मनोभावे केली, तर नक्कीच आपल्याच मनात, तो त्यावर तोडगा सुचवतो...'भवाच्या भया काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासि सांडी...'.असं समर्थ रामदासस्वामी उगाच सांगून गेले नाहीत...त्या रामालाच शरण जाऊ या....! 'दिनानाथ राम कोदंडधारी, पुढे देखता, काळ पोटी थरारी..........' रामावर श्रद्धा ठेवू या...मग भीती कसली?
अकाली मृत्यू कुणालाही नको...नैसर्गिकपणे, सहजपणे , कृतार्थ जीवन जगल्यावरच मरण यावे सगळ्यांना ..
.
राम राम म्हणतांना यावे, सहजच ते निजधाम,
देहवसन ते गळून पडावे, सत्य राम नाम |
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?