रघुपती होळी खेळतसे हो..
रघुपती होळी खेळतसे हो,
.
वसंतातली धुंद हवा ती, तरुवर डोलती, पक्षी गती,
आम्रतरूवर मोहर सुंदर, पलाशपुष्पे रंग उधळती |
.
मोहक,कुसुमे, गंधित केशर, कुंकुमाने तबके सजती ,
अवधनगरी, हर्षित, हर्षित, शरयुतीरी सारी जमती |
.
कोणा हाती असे झांज तर , कोणा हाती असे खंजिरा,
कोणी उधळी गुलाल आणि, कोणी उधळत असे अबीरा |
.
कोणी वाजवी मृदुंग सुंदर, कोणी डफ करताल मनोहर,
कोणी गातसे, होळीगीत ते, शब्द, सूर, लय , मधुर खरोखर |
.
मुग्ध किशोरी, जनककुमारी ,लाज विलक्षण मुखकमलावरी,
पाहे रघुवीर शरयुतटावरी, हाती त्यांच्या कनक पिचकारी |
.
धडधड धडधड होई अंतरी,बघून सावळी मूर्त साजिरी,
समीप येती रघुपती राघव, खट्याळ भाव ते श्रीवदनावरी |
.
राम फेकती, रंग सीतेवरी, चिंब चिंब ती होई बावरी,
लज्जा सारून, गुलाल टाकी, मधुमासाची किमया न्यारी |
.
होळी आली, होळी आली, गाई लक्ष्मण रामसंगती,
भरत घेई, ढोलक हाती, सुगंधी केशर शत्रुघ्नामुठी |
.
वैदेही सह सर्व सख्याही, रंगाची ती करती उधळण,
दृश्य अलौकिक बघावया ते, जमती सारे ऋषी, देवगण |
.
रघुपती होळी खेळतसे हो, रघुपती होळी खेळतसे,
निराकार ते ब्रह्मची केवळ, रंगरंगीले होत असे |
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
.
Comments