कोयनामाईस वंदन

माझी कोयनामाई....
जेव्हा जेव्हा मी कोयनानगरला जाते, कोयनेच्या दर्शनानं अक्षरशः अंगावर थरथर जाणवते. तिचं ते चमचमतं पाणी..मी अगदी वेडी होऊन जाते. तिच्याच काठावर मी आयुष्यातले किती तास सुंदर शांततेत घालवले आहेत. तिच्याच काठावरून किती सूर्योदयांची शोभा पाहिलीयं. ती माझी आई आहेच...पण त्यापेक्षाही जास्त ती माझी सखी आहे. कोयनामाई, तुला वंदन..!
.कोयनामाईस वंदन,
..
.
मंगले हे शक्तीदात्रे, जलस्वरुपिणी,तारिणे,
सह्यपुत्री हे तटिणी, कोयने जय कोयने ।
.
देसी तू राष्ट्रास ऊर्जा, वीज ती तुझ्यामुळे,
प्रगतीचा आलेख चढता, निर्मिती, तुझ्यामुळे,
तूच रेषा वैभवाची, तू गती समृद्धीची,
तू प्रचिती स्वर्गीची ती, कोयने, जय कोयने ।
.
हे सरिते, आणसी, रमणीयता वनराईने,
तारिसी सा-या जीवांना, निर्मले तव जीवने
डोंगरांनी, जलचरांनी, वनचरांनी, भूचरांनी,
थोरवी गावी किती तव, कोयने, जय कोयने ।
.
हे तरंगिणी, जीवदायिनी, तूच आई वत्सले,
उचंबळोनी येती हृदयी, भाव सारे कोवळे,
थेंब ते तुझ्या कृपेचे, अमृताचे प्राशिता,
धन्य होई देह सारा, कोयने जय कोयने ।
.
.
( सौ. शैलजा शेवडे )

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?