चाहती (कथा)
चाहती...( कथा )
सर,
तुमच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याचं काल पेपरात वाचलं. खरं तर तुम्हाला फोन करायला हवा होता. नाही केला. कारण मलाच माहित नाहीयं आपल्यात नेमकं अंतर किती आहे ते...!
जेमतेम चार महिने तुम्ही मला सतार शिकवलीत.मी विद्यार्थिनी, तुम्ही गुरू...कदाचित एवढचं नातं तुमच्या लेखी असेल. पण माझ्या मनात? तुम्हाला कल्पनाही नसेल, मी एक भावविश्व तयार केलं होतं. त्यात तुम्ही कृष्ण होता, आणि मी स्वरवेडी राधा...! अतिशय झपाटलेला तो अनुभव होता. तुमच्या तो कधीच लक्षात आला नाही. तुम्ही म्हणायचा, 'बघत काय बसलात? वाजवा ना, मी सांगितलेलं...! 'मी खुळ्यागत सतारीवरून बोटं फिरवायचे. माझ्या मनात शब्द असायचे,
नको माझ्या अधरी, हरी लावू पावरी
एक नाद एक घोष तुझे नाव अंतरी...!
मी काय राग, रागिणी ओळखणार? एकच ध्वनि तुमच्या नावाचा मनात घुमतोयं. मला सुंदर वाजवता यायचेच नाही.तुमच्या मी का लक्षात राहीन? पण तो सुंदर अनुभवही संपला. आमची दूर बदली झाली.संबंध संपले. तुमच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं. पण माझ्या काव्यविश्वात तुम्ही भरून राहिलात. कळतचं नव्हतं,नेमकं आपल्यात किती अंतर आहे ते...!
तुमचा तरूण मुलगा गेल्याचं कळलं.तेव्हाही मी नाहीच तुम्हाला फोन केला. तुमच्या वेदना मी भोगत होते. तुमचं अंतःकरण जाणून होते. प्रत्येक क्षणी अक्षरशः रडत होते. तुमचे झपाटलेले सतारवादन कानावर येत होते. दुःखातून बाहेर पडण्या मार्ग तुम्हाला सापडला होता. मला जाणवत होतं. खरचं नेमकं किती अंतर आहे आपल्यात?
..........................................................................................................
तिने पत्राची घडी करून कपाटात चोरकप्प्यात ठेवली. अशी असंख्य न पाठवलेली पत्रं होती. सरांना लिहिलेली. त्यात एकाची भर पडली. डोळे पुसून ती कामाला लागली.
........
तिचे मन मागे मागे गेले.
अशाच एका सुंदर सकाळी ती क्लासला सरांच्या घरी गेली होती. तिला जायला काही कारणाने उशीर झाला होता.तिची वाट पाहून ती येत नाही,असं समजून सरांनी त्यांच्या रियाझाला सुरुवात केली होती.सरांची पत्नी घरात नव्हती. जाळीचे दार लावले होते. ती जिना चढत असतांनाच सरांचे सतार वाजवणे ऐकू येत होते. ती क्षणभर दारापाशी रेंगाळली.दार वाजवावं का?नकोच. सतार वाजवण्यात व्यत्यय नको. तिने जाळीतून पाहिले. सर सतार वाजवण्यात रंगले होते. त्यांचे डोळे मिटले होते. ती दूर झाली. जिन्यात बसली. सतारीच्या स्वरांच्या धो धो पावसात भिजत. किती वेगळी दुनिया होती ती..!तिच्या सर्वांगाला, मनाला वेढून राहिलेले ते स्वर...! किती वेळ गेला कोण जाणे..!
एकदम ती भानावर आली, सरांची पत्नी तिला म्हणत होती,
'असं जिन्यात काय बसलात? आत का नाही गेलात?'
'अं..सर वाजवताहेत ना..उगीच त्यांना दार उघडायचा व्यत्यय कशाला? '
सरांच्या पत्नीने विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिलं. पुढे होऊन दाराची बेल वाजवली. सरांचे वाजवणे चालूच होते. मग वैतागून त्यांनी जोरजोरात कडी वाजवायला सुरुवात केली. सरांनी दार उघडले.
'काय हे...!कितीवेळ दार वाजवायचं?किती नादिष्टपणा...!' सरांची बायको जाम वैतागली होती.
'तुम्ही कधी आलांत?' सरांनी तिला विचारलं.
'बराच वेळ झाला.कुठला राग होता हा?खूप छान वाटत होतं.' तिने विचारलं.
ते सांगणार, तोपर्यंत खर्र...आवाज आला. सरांच्या बायकोनं मिक्सर सुरु केला होता. एकदा ती सतारीच्या क्लासला गेली होती. सरांनी तिला काही वाजवायला दिले. ती वाजवत बसली.सर बाहेरच्या खोलीत होते.तोपर्यंत कुणी आल्याचा आवाज आला. खूप आनंदाने हसण्याचा. पाठोपाठ सरांचा आवाज,'व्हॊट अ प्लीझंट सरप्राईज, वेलकम..वेलकम...!
नंतर नुसते खिदळण्याचे आवाज..मंडळी आत आली. तिनं पाहिलं, एक एकदम स्टाईलीश तरूणी,आणि एक तरूण आले होते. तिला एकदम अवघडल्यासरखे झाले. ती स्वयंपाकघरात गेली. पाण्याचे ग्लासेस भरत असलेल्या वंदनाला, सरांच्या पत्नीला तिने विचारले, 'कोण आहेत?'वंदना हसून म्हणली, 'अणिमा, तुमच्या सरांची शिष्या..आणि तिचे मिस्टर आहेत.तुम्ही बसा ना.' ती बसली. मध्येच अणिमाने तिची दखल घेतल्यासारखं करून सरांना विचारल, 'न्यू स्टुडंट?' सर म्हणले, 'येस..!'त्यांच्या परत गप्पा सुरू झाल्या. ती अणिमाकडे बघत होती. चेह-यावरून, पेहरावावरून खूप श्रीमंत वाटत होती. सफाईदार इंग्लीश बोलत होती. सुंदर होती. पण सरांशी बोलतांना अतिशय विनम्रपणे बोलत होती. तिला सर एकदम परके वाटू लागले. उगीचच स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण झाला. स्वतःची कशीतरी गुंडाळलेली साडी, केसांचा लांबसडक शेपटा, इंग्लीशमध्ये बोलायची भीती...!
ती सरांना म्हणली, 'मी घरी जाते.' सरांनीही थांबायचा आग्रह केला नाही.
ती घरी गेली. तिच्या मनात सहज विचार आला, ही शिष्याही, माझ्यासारखा विचार करत असेल सरांच्याबद्द्ल?
सर परदेशात कार्यक्रम करायला गेले. तिला खूप भकास वाटू लागले. तो सतारीचा क्लास तिच्यासाठी आनंद होता. आता प्रत्येक दिवस कंटाळवाणा वाटू लागला. आपल्याकडे सी.डी.प्लेअर असता, तर आपणही अणिमासारखे सतत ऐकत बसलो असतो. तिच्या मनात विचार आलो. घरात अवती भोवती इतकी माणसं होती, पण सरांची आठवण खूपच येत होती. मुलांचा गलका चालू होता.तिने सहज म्हणून रेडिओ लावला. रेडिओवरची निवेदिका निवेदन करत होती, 'आता ऐका श्रीयुत ....यांचे सतारवादन. नेमके तिच्या सरांचे सतारवादन लागले. काय हा योगायोग...! तिच्या डोळ्यातून नकळत अश्रूधारा येऊ लागल्या. ती डोळे मिटून रेडिओ ऐकत बसली.आसपासच्या त्या कोलाहलातही विलक्षण शांतता अनुभवत होती.
पुढच्या वेळी ती क्लासला गेली,तेव्हा वंदनाकडून तिला कळले, सर यू.के.ला सतारीचे कार्यक्रम करायला जाणार आहेत. त्या संदर्भातच अणिमा आली होती. तिला हेही कळलं, अणिमा सतार उत्तम वाजवते. ती सरांची विलक्षण चाहती आहे. घरात, कारमध्ये,ती सतत सरांची सतार वादनाची सी.डी.ऐकत बसलेली असते.सर परदेशात कार्यक्रम करायला गेले. तिला खूप भकास वाटू लागले. तो सतारीचा क्लास तिच्यासाठी आनंद होता. आता प्रत्येक दिवस कंटाळवाणा वाटू लागला. आपल्याकडे सी.डी.प्लेअर असता, तर आपणही अणिमासारखे सतत ऐकत बसलो असतो. तिच्या मनात विचार आलो. घरात अवती भोवती इतकी माणसं होती, पण सरांची आठवण खूपच येत होती. मुलांचा गलका चालू होता.तिने सहज म्हणून रेडिओ लावला. रेडिओवरची निवेदिका निवेदन करत होती, 'आता ऐका श्रीयुत ....यांचे सतारवादन. नेमके तिच्या सरांचे सतारवादन लागले. काय हा योगायोग...! तिच्या डोळ्यातून नकळत अश्रूधारा येऊ लागल्या. ती डोळे मिटून रेडिओ ऐकत बसली.आसपासच्या त्या कोलाहलातही विलक्षण शांतता अनुभवत होती.
सर आले. सगळीकडे त्यांचे कौतुक होत होते. त्यांचा चाहतावर्ग परदेशातही झाला होता. ती क्लासला गेली. नेमका सरांचा मुलगा छोटू रडत होता. वंदनाला काम करून देत नव्हता. ती म्हणली, ' मी छोटूला मांडीवर घेऊन बसते. तुम्ही स्वयंपाक करा.' छोटूही तिच्या मांडीवर शांत बसला. सर सतार वाजवत होते. नेहमीप्रमाणे, डोळे मिटून. वंदना स्वयंपाकघरात होती. छोटू मांडीवर झोपला होता. ती सरांकडे बघत होती. सूर कानात साठवत होती. तेवढ्यात वंदना तिथे आली. का कोण जाणे, तिला खटकले. छोटूला कॊटवर झोपवून ती ही मुद्दाम सतार ऐकत बसली.
एकदा सरांचा कार्यक्रम एका मोठ्या हॊलमध्ये होता. हॊल खचाखच भरला होता.तीही तिच्या पतीबरोबर गेली होती. कार्यक्रम सुरू झाला. अतिशय रंगत आली होती.सर नेहमीप्रमाणे डोळे मिटून वाजवत होते. मध्येच एक फिरत घेऊन बहारदारपणे समेवर आले. सगळ्या रसिकांनी एकसाथ व्वा..! केले. सरांनी डोळे उघडून एकवार तिच्याकडे पाहिले. जणू तिची पावती महत्वाची होती. तिने नजरेनेच दाद दिली. असं वाटत होतं, क्लास चालू आहे.सर आणि ती दोघचं आहेत.
कार्यक्रम संपल्यावर सरांचे अभिनंदन करण्यासाठी ती स्टेजकडे गेली. पण सरांच्याभोवती चाहत्यांचा गराडा होता. त्यामुळे भेट झालीच नाही. घरी येतांना तिचा नवरा म्हणला, 'वा वा..! लाडकी शिष्या दिसतेयसं तू.जणू तुझ्यासाठीच वाजवत होते ते. तुझ्याकडेच बघत होते.'
काहीतरीच काय...!तिने नव-याचे म्हणणे झटकून टाकले. नक्की त्यांच्या स्वरात काय होतं? मत्सर होता का? पण तिला त्या बोलण्याने आतल्या आत गुदगुल्या झाल्या. खरं तर वंदना, अणिमा, पहिल्या लाईनीत बसल्या होत्या. पण माझ्याकडेच सरांनी बघितलं. का? का?
त्या दिवशी घरी पाहुणे येणार होते. तिच्या नव-याने तिला आज क्लासला जाऊ नकोस,म्हणून सांगितलं.तीही बरं म्हणाली. पण क्लासची वेळ होऊ लागली, तशी ती बेचैन झाली. भाजी आणायला म्हणून घराबाहेर पडली, ती थेट सरांच्या घराकडेच गेली. तिच्या मनात ओळी उमटत होत्या,
'हे वेध त्या सुरांचे, की वेड माधवाचे,
तटतटा तुटती बंध, मनमोर मुक्त नाचे..!
नेहमीप्रमाणे काहीतरी कारण काढून तिने स्वतः वाजवायचे टाळले. सरांचे वादन ऐकत राहिली. वेडी होऊन..! सरांचे वाजविणे संपले.तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. तिच्या घरून होता. ती त्यांच्या घरी आहे काय, याची चौकशी करायला. सर म्हणले, 'घरी जा. पाहुणे वाट बघताहेत.' ती अनिच्छेनेच निघाली.मनात ओळी उमटल्या,
तुझे रूप चित्तास मोहिनी घाली, मना ओढिते रे, तुझी बासरी,
आम्ही गोपस्त्रिया नादावलो रे, नको निष्ठुरा, सांगू, जाण्या घरी..!
ती जिना उतरू लागली.सरांच्या मनात अजून सूर घोळत होते बहुतेक. कारण सरांनी परत सतार वाजवायला सुरुवात केली होती.
छेडिलीस का फिरूनी, तार तू सतारीची,
रोखलीस का अशी, फिरून वाट दारीची...?
ती परत जिन्यात बसून राहिली. किती प्रयत्न केला, तरी ती जाऊ शकतच नव्हती. देवापाशी प्रार्थना करत राहिली, कुणी आपल्याला असे बसलेले बघू नये....!
त्यादिवशी घरात खूपच चिडाचिड झाली.खरचं नेमकं काय नातं होतं सरांच्यात आणि आपल्यात? सरांच्यामुळे आपल्याला भागवतील गोपींची मनःस्थिती कळू शकतेयं.
खूप खूप सुंदर होतं सगळं. पण अचानक मध्येच सगळं थांबलं. तिच्या नव-याची बदली झाली होती. आता जावं लागणार होतं दूर.. दूर...!
पाऊस लांबला होता. उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. त्यात आणि हा दुराव्याचा विचार...!
जायच्या आधी हिंमत करून ती सरांच्या घरी गेलीच. सरांनाही कळलं होतं, त्यांची बदली झालीयं ते..!पण ते कधीच प्रतिक्रिया देतच नसत. त्या दिवशी ती दुपारी सरांच्या घरी गेली खरी, पण मनात विलक्षण भीती होती. घरचे काय म्हणतील?
त्या दिवशी सरांनी तिच्यासाठी,खास तिच्यासाठी, सतार वाजवली. बाहेर ऊन मी म्हणत होतं. सरांनी रागाचं नाव सांगितलं, 'मेघमल्हार'
इतका सुंदर अनुभव तिने यापूर्वी कधी घेतला नव्हता. तो राग तिने पहिल्यांदाच ऐकला. ते स्वरांचं बरसणं...!
आणि एक अदभूत घडलं. बाहेर काळोख दाटून आला.ढग गरजू लागले. पाऊस कोसळू लागला. तानसेनाच्या संगीताबद्दल ऐकलं होतं. पण मनाने नेहमी थट्टा केली होती. असं एखाद्या रागाने दिवे लागतात का? असं राग म्हणण्याने पाऊस पडतो का? पण आज तो अनुभव प्रत्यक्ष आला होता.तिचं मनही गाऊ लागलं,
लेऊन आले, ग्रीष्मझळांना, त्या दुपारी भॆटीसाठी,
छेडिला मल्हार तू, माझ्याचसाठी, माझ्याचसाठी...!
तडफडणारं मन, त्या पावसांनं शांत झालं होतं.ती निघाली, सरांचा निरोप घेऊन...!
पण घरी तिच्यासाठी वेगळचं वादळ वाट पहात होतं. ती घरात न सांगता बाहेर पडली होती. जोरात पाऊस सुरु झाला होता. तिचा पत्ता नव्हता. तिच्या नव-याला काळजी वाटू लागली. कुठे गेली असेल ती? त्याने तिच्या मैत्रिणींकडे फोन लावला. त्यांना माहित नव्हते. तिच्या सरांच्या कडे फोन लावला. पण पावसामुळे नेमका त्यांचा फोन डेड झाला होता. कुठे शोधायचं तिला?
तिला जाऊन तीन तास झाले होते. तिचा पुतण्या आला होता. त्यामुळे तो, आणि तिचा नवरा दोघं मिळून संभाव्य ठिकाणी तिला शोधू लागले होते.
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे तिचीही तारांबळ झाली होती. ती पाऊस थांबण्याची वाट बघत बसली होती.शेवटी एकदाचा पाऊस थांबला. ती घरी गेली.
इतका वेळ नवरा तिची काळजी करत होता, त्या काळजीचं तिला बघून एकदम रागात रुपांतर झाला. नव-या रौद्रावतारपाहून ती घाबरून रडूच लागली. नवरा अधिकच चिडला. 'कुठे गेली होतीस तू?' या साध्या प्रश्नावर रडायला काय झालं?
शेवटी तिने रडत रडतच सरांकडे गेले होते, असं सांगितलं. पण का गेली होतीस? आणि न सांगता का गेली होतीस? या प्रश्नाचे तिला उत्तर देताच आलं नाही.शेवटी पुतण्यासमोर, मुलांसमोर तमाशा नको. म्हणून नवरा गप्प बसला. घरात वादळानंतरची शांतता पसरली होती.
रात्री मुसमुसणा-या तिला तिचा नवरा म्हणला, 'तुझ्या सतारीच्या शिक्षणाला मी कधी नाही म्हणलं का? उलट तुला हौस आहे, म्हणून मी सतार विकत घेऊन दिली. मी कधीही तुझ्या सरांबद्दल संशयही घेतला नाही. मग तू अशी का वागलीस? मला राग तुझ्या बेजबाबदार वागण्याचा आला. मला न सांगता सरांकडे गेलीस, त्याचा आला. तुझा माझ्यावर विश्वास नाही, या विचाराचा आला.'
ती अधिकच खजिल झाली. ' चुकलचं माझं...!'ती मनापासून म्हणली. तिच्या बोलण्यामुळे तणाव कुठल्याकुठे पळून गेला. राधेच्या नव-याला कसं वाटत असेल,आपली बायको कृष्णासाठी वेडी झाली आहे या जाणीवेनं? मनात हा विचार चमकून गेला. ती चपापली. एकदम नव-याबद्दल कणव, प्रेम दाटून आलं. ती नव-याच्या कुशीत घुसली.
.........................................................................................................................................नवा गाव, नवं घर, मुलांना शाळेत घालण्याची प्रक्रिया... काही दिवस तर गडबडीत गेले. खूप दिवसांनी दुपारी मोकळा वेळ मिळाला. सतार घेऊन बसली.वाजवण्याचा प्रयत्न करू लागली. एकदम सरांची भळभळ आठवण येऊ लागली. सरांना येत असेल आपली आठवण? उगाच मनात प्रश्न आला. उदास वाटू लागलं.
कृष्ण गोकूळ सोडून गेल्यावर गोपींना कसं वाटलं असेल?
प्राण आहे कुंठलेला, प्राणवायू कुठे?
वृक्षवेलींनो, झ-यांनो, कृष्ण तो आहे कुठे?
कशा त्या गोपी कृष्णाची, त्याच्या बासरीवादनाची आठवण काढत व्याकूळ होत असतील.. कसं त्यांना आयुष्य नीरस वाटत असेल..याचा ती अनुभव घेऊ लागली. आणि पहिलं पत्र लिहिलं सरांना,
काल कालिंदी तीरावर, घुमली त्याची बासरी,
मेघ होऊन तो बरसला, मी ती वीज नाचरी..
स्वरसप्तक ते लुप्त झाले, स्वर्ग अवतरला जिथे,

................................................

एकदम स्वतःच दचकली. हे पत्र, ही कविता आपण कसं पाठवणार? काय समजतील लोक..!छे..छे..आपल्याला संसार करायचा आहे. यापुढे या भावना आपल्यापुरत्या सीमित ठेवायच्या.तिने ते पत्र चोरकप्प्यात ठेवलं.
किती दिवस गेले...तीही रमली होती संसारात. आणि अचानक एक दिवस तिची जुनी मैत्री तिला भेटली.सहज बोलता बोलता ती म्हणली, 'तुझ्या त्या सरांचं, आणि त्यांच्या बायकोचं पटत नाही का गं? कोण ती अणिमा तिच्यावरून बायको त्यांच्या वैतागलेली असते म्हणे. तिच्यावरून संशय घेते. माझ्या आपलं काहीबाही कानावर आलयं हं फक्त..! मलाही नक्की माहित नाही.'
...'छे..! काहीतरीच काय..! असं होऊच शकत नाही...! लोक काय वाट्टेल ते बोलत असतात.'ती फणकारून म्हणाली.
'का? तू कसं काय एवढं छातीठोकपणे सांगू शकतेस असं काही नसेल म्हणून? तुझा आणि सरांचा किती असा सहवास तो?' मैत्रीण म्हणली.
'कारण मला सरांचा स्वभाव माहित आहे गं. माझ्यावर विश्वास ठेव. आणि प्लीज असं त्यांच्याबद्दल बोलू नकोस..!'
मैत्रीण आश्चर्याने पहातच राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
'जाऊ दे तो विषय...!'मैत्रीण म्हणली.
त्या रात्री तिनं पहिल्यांदा सरांच्या पत्नीसाठी पत्र लिहिलं.म्हणजे लिहायला घेतलं. पहिल्यांदाच ती सरांचा नाही, तर त्यांच्या पत्नीचा विचार करत होत होती. कसं असेल तिचं आयुष्य? कसं असेल तिचं भावविश्व? एका मनस्वी कलाकाराची पत्नी म्हणून जबाबदारी पेलतांना तिची ओढाताण होत असेल का?महिन्याचं सामान, मुलांचं दुखलं खुपलं, लाईटबिल, पाणीबिल भरणं...बाकी इतर जबाबदा-या...शिवाय सरांचे कार्यक्रम..त्यांचा रियाझ..त्यांचे चाहते..त्यांच्या घरची रसिकांची उठबस...खरचं सगळ कसं करत असेल ती?
मागे सर यू.के.ला गेले होते, तेव्हा ती सरांच्या घरी गेली होती, तेव्हा गप्पा मारता मारता सहज त्यांची पत्नी म्हणून गेली होती, 'यांच्या डोक्यात सतारीशिवाय काही नसतचं. आमचं नुकतचं लग्न झालं होतं, तेव्हाची गोष्ट..सासुबाई बाहेर गेल्या,की मी एकदम मोहरून जायचे. मला वाटायचं, एकांताचा फायदा घेऊन ते मला जवळ घेतील, प्रेमाच्या गोष्टी बोलतील..पण यांच्या ते गावीही नसायचं.. तेलगेच सतार ओढून रियाझ करायला घ्यायचे..'प्रिय वंदना,
कशी आहेस? आज तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. माझ्या मैत्रिणीकडून कानावर काही आले. त्यामुळे मन विलक्षण बेचैन झाले.
वंदना, तू सरांबद्दल असा कसा काय विचार करू शकतेस? तुला माहित आहे,की सरांच्या मनात फक्त सतारीचे सूरच घुमत असतात. कबूल आहे, अणिमा त्यांची चाहती आहे. पण मला जाणवलयं, तिच्याही मनात फक्त दादिडदा चालू असतं. तिला केवळ सूर मोहित करत नाहीत, ती केवळ स्वरवेडी नाही, तर तिच्या मनात स्वरसम्राज्ञी बनण्याची प्रबळ इच्छा आहे. त्यासाठी तिला सरांची मदत हवीयं.बाकी काही नक्कीच नसणार गं तिच्या मनात..!
तुझ्या मनात असा संशय का आला आपल्या नव-याबद्दल? अणिमाचं अंतरंग एकवेळ तुला माहित नसेल..पण तुझ्या नव-याचं तर तुला माहित असेलच ना..! स्फटिकासारखं स्वच्छ आहे गं सरांचं मन..! त्यात कुठेही वाईट वासना नाहीत. चार महिन्याच्या तुटपुंज्या सहवासातूनही माझ्या जे लक्षात आलं, तेतुझ्या का येऊ नये?
कसले तरी भलतेसलते विचार करू नकोस..देवानं इतका मौल्यवान ठेवा तुला दिला आहे, सांभाळ गं तो..!
.............................................................................................................................
ती पत्र लिहीत होती, आणि स्वतःशीच दचकली. हे पत्र पाठवू शकू आपण तिला? आपला संबंध काय? काय हा वेडेपणा..!
तिने तेही पत्र पाठवलेच नाही. तेही पत्र तिच्या चोरकप्प्यात गेलं.सतारीच्या सुरांची कोवळीक तिच्या मनात होती. सरांचं आणि तिचं एक अनोखं नातं तिनं जपून ठेवलं होतं. तिला खात्री होती अणिमाच्या रुपानं सरांच्या संसारात आलेलं वादळ शमणार आहे. तसचं झालं होतं. नेमकं काय झालं होतं माहित नाही, पण सरांचा संसार छान चालला होता. सरांचा रियाझ, क्लासेस, कार्यक्रम सर्व छान चाललं होतं.
.......नवीन गावी तिनेही सतारीच्या क्लासची चौकशी केली. जायलाही लागली. पण नाही आवडलं नवीन सरांचं शिकवणं..! नवीन शहरात प्रत्येक गोष्ट पैशावर तोलली जात होती. फी तर बरीच होती, पण परत एकदा सारेगमप..च शिकवायला सुरुवात केली होती. महिनोन महिने तेच ते. गाडी पुढे सरकलीच जात नव्हती. शिवाय एकाच वेळेला बरेच विद्यार्थी..! तिच्याकडे वैयक्तिकरित्या शिक्षक कशाला लक्ष देतील? सगळ्यांबरोबर तिचं शिक्षण..! तिने कितीही रियाझ केला असू दे,ती बाकीच्यांपेक्षा कितीही छान वाजवत असू दे, जोपर्यंत एखादी गत सगळेच चांगले वाजवू शकत नाहीत, तोपर्यंत पुढे जायचे नाही, असा तिथला खाक्या होता.
तिला सरांची आठवण यायची. किती निरपेक्षपणे ते शिकवत होते..! किती सुंदर सतार ते ऐकवायचे...! संगीतात ऐकणंही किती महत्वाचं असतं...!
तिनं कधीतरी तो क्लास सोडून दिला..! तिची सतार गवसणी ओढून कधीची कोप-यात जाऊन बसली.
.................किती दिवस...किती महिने... किती वर्षे....! आणि अचानक एक दिवस तिला पेपरात सरांचा फोटो दिसला. त्यांच्यावर लेख लिहून आला होता. त्यांना कुठलासा पुरस्कार मिळाला होता.
तिनं बरीच धडपड करून सरांचा फोन नंबर मिळवला. फोन केला. सरांनीच उचलला. ' नमस्कार सर...! आजच्या पेपरात तुमची बातमी वाचली. खूप आनंद झाला. अभिनंदन...!'
ती खूप उत्साहानं बोलत होती. पलिकडून आवाज आला. 'धन्यवाद..! कोण बोलतायं आपण?'
ती एकदम थबकली. तिच्या लक्षातच आलं नव्हतं,इतक्या वर्षांनी सर तिचा आवाज कसा ओळखतील? ती तरीपण तितक्याच उत्साहानं म्हणली, ' सर मी,....' सरांच्या लक्षात ओळख आली नाही. तरी तिचा उत्साह कमी झाला नव्हता. 'मी पंधरा वर्षापूर्वी तुमच्या घरी क्लासला यायचे......'
'सॊरी..! आठवत नाही.पण परत एकदा धन्यवाद..!' फोन संपला.
तिच्या डोळ्यात मेघ दाटून आले होते.नंतर किती काळ तिचे डोळे गळत होते. तिला एकदम सगळ्यांचा राग आला. तिने ती चोरकप्प्यात ठेवलेली पत्रे काढली. फाडून टाकावी का सगळी? तिने तावातावाने एक पत्र हातात घेतलं. पण ते फाडण्याऐवजी वाचत बसली.मग दुसरं मग तिसरं....! शेवटी तिनं ती पत्रं फाडलीच नाही. परत एकदा त्या मनोहर भावविश्वात रमून गेली. शेवटी शांतपणे डोळे पुसले.ती पत्रे जागेवर ठेऊन दिली.
........काळ पुढे सरकतच होता. अचानक तिच्या कानावर ती वाईट बातमी आली. अपघातात सरांचा तरूण मुलगा गेला. मन विदीर्ण झाले. किती दुःख सरांना...! कसे सामोरे जातील सर? फोन करायला हवा..! ती फक्त रडत होती. नको... फोन नको..! आपण स्वतःच गेले पाहिजे...
नेमकी तिच्या मुलाची बारावीची परीक्षा चालू होती. तिनं नव-याला सरांच्या मुलाच्या मृत्युची बातमी दिली. नव-यालाही खूप दुःख झाले. तोही हळहळला.पण पुढे ती म्हणली, 'मी जाते तिकडे.' तेव्हा नवरा दचकलाच. पटकन म्हणला, 'डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? तुला हे सुचतं तरी कसं? इथं बोर्डाची परीक्षा चालू आहे. आणि तू तिकडं निघून जाणार?मला चालणार नाही. इतकचं नाही तर तो विषय घरात परत परत काढायचाही नाही.त्याच्या अभ्यासावर परीणाम होईल. तसाही आपला इतका संबंध राहिला आहे कुठे?'
घरात नव-याचं वाक्य शेवटचं वाक्य होतं. त्यापुढे बोलायचं नाही...! ती मनातल्या मनात रडत राहिली.काळ पुढे सरकला. एक दिवस सरांचं सतारवादन रेडिओवर लागलं होतं. ते ऐकून तिचं मन सरांच्या आठवणीनं फार बेचैन झालं. न राहवून तिनं सरांना फोन केला. पण या वेळेला सरांनी तिचा आवाज ओळखला. सर म्हणले, 'खरं तर मीच तुम्हाला फोन करणार होतो. काही कामानिमित्त मला त्या भागात यायचं आहे. मिटींग झाल्यावर मध्ये थोडा वेळ आहे. तेव्हा तुमच्या घरी यायचा विचार आहे.'
ती मोहरून गेली. खरचं? खरचं सरांची भेट होणार? किती वर्षांनी..! तिनं नव-याला ती बातमी सांगितली. बायकोच्या चेह-यावर उतू जाणारा आनंद बघून तोही सुखावला.
'वा! छानच बातमी आहे. पण मी ऒफीसात असेन. माझी गाठ पडणार नाही.काही हरकत नाही. त्यांचं चांगलं आदरातिथ्य कर. आणि हो..! त्यांच्या मुलाचा विषय काढू नकोस. उगाच जखमेवरची खपली काढल्यासारखं होईल.'
तिचा नवरा खरोखरच समजूतदार होता. तिला नव-याचं कौतुक वाटलं.
मग पुढचे काही दिवस मंतरलेले गेले. परत एकदा ती पत्रे, त्या कविता बाहेर निघाल्या. शेवटी सरांचा यायचा दिवस उजाडला. तिनं सकाळपासून स्वयंपाकघरात रांधायला सुरुवात केली होती. आपले कसब पणाला लावून चार जिन्नस बनवले. घरात ती एकटीच असणार होती. तिनं सतार बाहेर काढून ठेवली.सरांना आज जेवण झाल्यावर सतार वाजवायला सांगायचे. अर्थात आपण सांगायची गरज पडणारच नाही म्हणा...! ते स्वतःहून वाजवतील. माझ्यासाठी.. आज आपण त्यांना ती पत्रे प्रत्यक्ष वाचायला द्यायची का? आपल्या मनात इतकी वर्षं जपलेलं गुपित आपण सांगावं सरांना..! काय हरकत आहे? त्यात गैर तर काहीच नाहीयं.
त्या विचारानेच तिच्या मनातली धडधड वाढली. तोपर्यंत सरांचा फोन आला. ते रस्ता विचारत होते. घराच्या जवळ आले होते. तिनं घराची खूण सांगितली. आता फक्त काही क्षण..केवळ काही क्षण उरले होते.
बेल वाजली. अत्यंत अधिरतेनं तिने दरवाजा उघडला. आणि प्रचंड अपेक्षाभंग झाला. तिची कॊलेजातली एक जुजबी ओळखीची मैत्रिण दारात होती.'हाय..! ओळखलसं का मला? मी निकीता..! तुझ्याच कॊलेजात, पण केमिस्ट्री प्रिन्सिपल सबजेक्ट...! सरप्राईझ दिलं की नाही तुला?'
'हो! ओळखलं ना तुला...! कशी काय आलीस आज? आणि पत्ता कसा मिळाला माझा?'
ती मनातली विलक्षण नाराजी लपवत, उसनं हसू तोंडावर आणण्याचा प्रयत्न करीत म्हणली.
'ती पण एक मज्जाच आहे. पण आधी कुणाला बरोबर आणलयं, ते बघ.'निकीता म्हणाली.
तिच्या आडून एक व्यक्ती पुढे आली. ज्या व्यक्तीची ती आतुरतेनं वाट पहात होती. हो..! तिचे सतारीचे सर..!
'सर...! या ना. आत या ना...' ती आनंदानं म्हणली.
दोघं आत आली. निकीताची टकळी सुरू झाली.
'अगं आज मिटींग झाल्यावर सर म्हणले, म्हणजे मला नाही, दुस-या कुणाला तरी, की मला xxx च्या घरी जायचयं. तुझं नाव ऐकताच मी म्हणलं, 'अहो, ती तर माझी कॊलेजातली मैत्रिण. मीही येते तुमच्याबरोबर. तिला सरप्राईज देते. आणि आले त्यांच्याबरोबर..मजा आली ना?'
'हो ना..! ' ती बळेबळेच हसत म्हणाली.
सरांकडे पाहिलं. केस विरळ झाले होते. चेहरा थकल्यासारखा दिसत होता.
पुढचे दोन तास निकीता अखंड बडबडत होती. त्यातनं तिला कळलं सर आणि निकीता एका प्रोजेक्टच्या मिटींगसाठी आज एकत्र आले होते. पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होते.
जेवतांनाही तिची बडबड चालूच होती. सरांनी खाद्यपदार्थाचे मनापासून कौतुक केले. पण तेव्हाही निकीतानं आपलचं घोडं पुढे दामटलं. ती तो पदार्थ कसा वेगळ्या प्रकारे करते, वगैरे.. वगैरे..!
जेवण झाल्यावर तिनं कौतुकानं सतार पुढे घेतली. सरांचा विशेष मूड दिसत नव्हता वाजविण्याचा. पण तिला सतार ऐकायचीच होती. परत एकदा सरांची सतार ऐकतांना तिला हरवून जायचं होतं. अगदी निकीताची अखंड बडबडही..
तिने सतारीची गवसणी काढली. सतारीला मोकळा श्वास घेऊ दिला. आणि एकदम खजिल झाली.
......सतारीच्या तारा गंजल्या होत्या....
तिला खूप वाईट वाटलं. अशा कशा तारा गंजल्या? सगळं आपण गृहित का धरलं? आपल्याला वाटलं होतं, तारा उतरतील फक्त. आणि सर परत जुळवून देतील. आता सरांची सतार ऐकायला मिळणार नाहीच. खूप रडावसं वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. बोलायला तोंड उघडलं तरी शब्दाऐवजी हुंदकाच बाहेर पडेल, अशी भीती वाटत होती.
'काय हे..! आज सर येणार म्हणल्यावर सतारीची गवसणी काढून तरी बघायची होतीस ना.. मलाही सरांचं सतारवादन ऐकता आलं असतं.'निकीता बडबडली. सरांनी एक दोन क्षण त्या दोघींकडे पाहिलं. आणि ते टीपॊयवरचा पेपर वाचण्यात गर्क झाले.
तिला निकीताशी बोलावसं वाटेना.
मनातली निराशा कशी लपवायची हेच कळेना. मग ती निकीताला म्हणली,'बसा तुम्ही बोलत. मी किचन आवरून येते.'
निकीता आणि सर ते ज्या कामासाठी मिटींगला आले होते, त्याबद्दल बोलत बसले. मध्येच सर म्हणले, 'मी जरा बाहेर जाऊन सिगारेट ओढून येतो.'आणि ते बाहेर गेले. निकीता काहीतरी वाचत बसली.
स्वयंपाकघरात ओटा साफ करतांना ती विचार करत होती.'नक्की आपल्याला कसलं वाईट वाटतयं?'अचानक तिला सर परके वाटू लागले. सरांकडे फक्त एक व्यक्ती म्हणून कधी बघितलेच नव्हते. सर म्हणजे फक्त सतार वाजवतांना.. असेच चित्र डोळ्यापुढे होते. सिगारेट ओढणारे सर?... ओके ना..! त्यात काय झालं? त्याबद्दल नाही वाईट वाटत.मग कशाबद्दल?
आपल्या मनानं सरांच्या भेटीचं जे चित्र रंगवलं होतं, ते भंगलं म्हणून?...ही मध्येच जुजबी ओळखीची मैत्रीण कशी टपकली चित्रात? म्हणून वाईट वाटतयं?
नाही नाही ..जे होतं ते भल्यासाठीच होतं. समजा आपण जसं चित्र रंगवलं तसचं झालं असतं तर? किती वेडेपणा ठरला असता..सरांना काय वाटलं असतं आपल्याबद्दल? नाही..नाही. काय करणार होतो आपण..! छे..! चुकीचचं होतं तसा विचार करणं. आपला संसार.. समाजातलं आपलं स्थान..!
किती बदलली आहेत आयुष्य आपली...काळही किती सरकलायं पुढे.. गंजलेल्या तारांनी हेच दाखवून दिलयं ना, की आपल्या जीवनात इतर गोष्टी आपल्याला जादा महत्वाच्या वाटताहेत.
तिच्या लक्षात आलं, सुंदर, कोवळं, हळवं काहीतरी तिच्या हातातून निसटून गेलं होतं. आता परत ती सतार ऐकतांनाची धुंदी नव्हती येऊ शकणार आयुष्यात...!
आणि ते राधा बनणं.. सरांच्या रुपात कृष्ण पाहणं... हेही संपलं होतं. त्यांचं दुःख जास्त होतं. पण इलाज नाही. 'कालाय तस्मै नमः'तिनं मनाची समजूत घातली आणि ती तोंड धुवून हॊलमध्ये आली.
'हे काय?सर कुठायतं?' तिनं निकीताला विचारलं.
'सर गाडीतून काहीतरी आणायला गेलेत.' निकीता म्हणली.
इतक्यात सर हातात एक लेदरबॆग घेऊन आलेच.
'द्या ती सतार इकडे.' सर सहजपणे म्हणले. ती अचंबित होऊन पहात होती. सरांनी तिची सतार हातात घेतली. खुंट्या पिरगळल्या. आणि सगळ्या तारा काढून टाकल्या. मग त्यांच्याकडच्या लेदरबॆगमधून काही सामान बाहेर काढलं.
'सर...' ती गदगदलेल्या स्वरात म्हणली. तिच्या लक्षात आलं, सर आपल्या सतारीला नवीन तारा बसवताहेत.
'इतकं इमोशनल व्हायची गरज नाही. मला आठवलं माझ्या कारमध्ये सतारीच्या तारा, पकड वगैरे असलेली माझी बॆग आहे. म्हणून मी जाऊन आणली. आता नवीन तारा बसवतोयं.परत सतारीचा रियाझ सुरू करा.' सर हसत म्हणले.
तिनं फक्त मान हलवली. आणि सरांच्या समोर बसली.
नंतर बराच वेळ तारा लावणं चाललं होतं. ती अतिशय शांतपणे बसली होती. अर्थात हे काम चालू असतांना शांत बसायचं असतंच. तिला याची सवय होती. तिला खूप आनंदही होत होता.
पण निकीताला इतका वेळ शांत बसायचं अगदीच जिवावर आलं. तिची चुळबुळ सुरु झाली. शेवटी ती कंटाळून म्हणली. 'मी निघते.' सर तारा लावण्यात गर्क होते. त्यांनी एक क्षण मान डोलावून तिला निरोप दिला.
ती मात्र निकीताबरोबर दारापर्यंत गेली. आणि कुजबुजणा-या आवाजात म्हणली, 'थांबली असतीस अजून जरा वेळ तर ह्यांचीही गाठ पडली असती.'
असू दे.परत येईन. आता घर माहीत झालं आहेच.' निकीता हसत म्हणाली. आणि गेली.
ती आत येऊन परत सरांच्या समोर येऊन बसली.तारा लावून झाल्या होत्या. आता सर त्या तारा स्वरात जुळवत होते.मनासारख्या तारा जुळवून झाल्यावर सरांनी सतार खाली ठेवली. तिच्याकडे बघून मंद हसत विचारलं, 'बोला. काय वाजवू?'
ती एकदम संकोचली. काहीच बोलली नाही. मग सरांनी सतार वाजवायला सुरुवात केली.
एकदम हळवे, कोमल स्वर वातावरणात भरून राहिले. बतुतेक पुरिया राग होता. सर वाजवत होते. आलापी चालू होती. तिच्या डोळ्यात पाणी तरळत होते. सरांचे अर्थातच तिकडे लक्ष नव्हते. ते डोळे मिटून वाजवत होते.
ती फक्त ऐकत होती. जिवाचे कान करून ऐकत होती. किती वेळ गेला कुणास ठाऊक. तिनंही डोळे मिटले होते. अचानक कसलीतरी जाणीव झाली, म्हणून तिनं डोळे उघडले. तिचा नवरा लॆचकीनं दार उघडून आत आला होता. ती गडबडीनं उठायला गेली. नव-यानं हातानचं तिला बसून रहायची खूण केली. हात पाय धुवून तोही सतार ऐकायला तिच्याजवळ येऊन बसला.सरांचे डोळे मिटलेलेच होते.
विलक्षण आनंद तिच्या मनात भरून राहिला होता. हे संगीत कधी संपूच नये...!
कोण आहेत सर? कोण आहे मी?...सगळे प्रश्न संपले होते. फक्त सूर उरले होते. एक कविता उरली होती.
....सूर कोवळे मंतरलेले,
जागवती ती मोहनबाधा,
थरथरणा-या क्षुद्र देही मग,
अवतरते ती त्रिकाल राधा ।
...

(सौ. शैलजा शेवडे)
Comments