परशुराम, राम भेट

पक्षी भयंकर शब्द करती, घोर भय जणू आले सुचवती,
वारा वाहे  सुसाट केवळ, अंधारूनही आले भवती |
भान दिशांचे कोणा नुरले, धूळीने भवताल व्यापले,
दशरथाच्या सामोरी ते, क्रुद्ध परशुराम उभे ठाकले ||
.
कैलासासम असती दुर्धर्ष, कालाग्निसम असती दुःसह,
स्कंधी परशु, हाती धनुष्य ते, क्षत्रियनाशक महाउग्र ते,
धगधगत्या तेजाने  जणू त्रिपुरांतक असे शिवच भासले, 
जटाधारी परशुराम क्रोधे, श्रीरामाशी बोलू लागले |
.
'हे रामा, तव वीर्य अकल्पित,, शिवधनुष्यभंग,कृत्यही  अद्भूत,
लाव बाण या वैष्णव धनुवरी, दाखव तव सामर्थ्य त्वरीत |
हे धनुष्य आहे श्रीविष्णूचे, प्राप्त होई मज हे परंपरेने,
क्षत्रिय असशी ,तर लाव चाप त्याला, आणि हो तयार द्वंद्वाला |
.
अति विनीत, सुकुमार राघव, बोले विनयाने, 'हे भार्गव,
हे ब्रह्मन, कर्तृत्व तुझे जरी मान्य, तरी का करीसी अवमान,
क्षात्रधर्मे मी संपन्न, नको समजूस मज वीर्यहीन,
 बघ माझे तेज पराक्रम, हा पहा लाविला बाण |
.
हा बघ चढवला बाण धनुवर, दिव्य वैष्णव हा बाण खरोखर,
शत्रूबलदर्प हरवी हा तर , शत्रुनाश करी, व्यर्थ ना जाई हा तर,
तू  ब्राह्मण  पूज्य,तर, कसा सोडू मी सांग  तुझ्यावर,
पण नष्ट करितो तव तपसामर्थ्य, तेज गती, मिळवलीस आजवर |
.
श्रीरामाच्या ठायी त्याचे तेज प्रविष्ट झाले , निर्वीर्य भार्गव रामाला बोले,
.
'ओळखले बघ  तुला मी रामा, विष्णूच तू रे, शत्रुतापना,
जरी पराजित,तुझ्याकडून मी, नाही कारण लाज वाटण्या |
त्रैलोक्याचा नाथ असे तू, तुझ्यासारखा वीर तूच तू,
सुरगण , ऋषीगण गौरवीत तुज, सदाचरणसंपन्न राम तू,'
.
राम तयाचे,करीतो पूजन,  जमदग्निपुत्र मग जाई निघून,
पुन्हा फिरून दशदिशा उजळती, जय जय राम सारे हर्षती | 
.
(सौ. शैलजा भा. शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?