कुणास्तव असे

कुणास्तव असे, उगाच झुरणे, नको रे मना,
पहा परत नाचला, मयुर हा तुझ्या अंगणा,
किती बरसल्या, तुझ्याच करिता, सरी सांग ना,
कुणी तुज दिले, असे किरण कोवळे माळण्या |
.
जरी समय तो, उदास गमतो, तिन्हीसांजचा,
तरी अटळ रे, मना क्षण असे, रवी यायचा,
अहा परत, ओंजळीत भरती, सुखाच्या खुणा ,
उगाच कुढसी, किती क्षणिक ती,असे वेदना |
.
पहा दशदिशा किती खुणवती, कधीच्या तुला,
अता उघड पंख रे, पकड तो, नभीचा झुला,
तुझे क्षितिज ते क्षणात गवसे, खुले हास ना,
कशास मग ते ,निराश बनणे, असे रे मना |
.
नवा बहर ही वनात मधुमास आला अहा ,
नवे कवन ते मनात फुलते म्हणूनी पहा ,
नवीन गत ही, नवी फिरतही, नवा राग ना,
तरी सम कुठे, खुणा समज, ताल दे धाधिना |
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
.
.

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?