दक्षिणामूर्ति स्तोत्र


विश्व दर्पणबिंब तुल्य नगरी आत्मस्वरूपी असे
मायेने बघतो स्वतःस जणु का बाहेर स्वप्नी जसे,
देती ज्ञान असे प्रबोध समयी अद्वैत आत्माच हा,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |१|
.
बी च्या आतच अंकुरागत असे विश्व विकल्पाविना,
मायेने मग चित्रिलेच सगळे देशास कालास या,
मायावी सम योगशक्तिच जिने स्वेच्छे जगा निर्मिले,
त्या या श्री गुरु मूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |२|
.
ज्याच्या सत्स्फुरणामुळेच गमते चैतन्य ते निर्जिवा,
देई 'तत्वमसि' अशीच प्रचिती जे येत त्या आश्रया,
साक्षात्कार असा मिळे न फिरुनी येणे त्या या जगा,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला |३|

.
नानाछिद्र घटामध्ये उजळतो तेजाळ मोठा दिवा,
देहातील तसेच तत्त्वं प्रकटे ज्ञानेंद्रियाच्यातुनी,
'जाणे मी ' उजळे समस्त जग हे जाणीव ज्यांच्यामुळे,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |4|
.
देहां, प्राण व इंद्रियांस कुणी बुद्धीस शुन्यास त्या,
'आत्मा' बोलत स्त्री जडागत सदा भ्रांती बहु बाष्कळा,
मायाशक्ति विलास कल्पित महा व्यामोह संहारितो,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |५|
.
राहुग्रस्त रवीशशी सम कशी मायाच आच्छादिते,
आत्मतत्त्व असे प्रदिप्त पण ते निद्रेमुळे ना कळे,
'होती झोपच ती ' प्रबोध समयी ये ज्ञान ज्यांच्यामुळे,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |६|
.
बाल्य जागृत या स्थितीत अजुनी सा-या अवस्थांमध्ये,
आत्मतत्त्वच ते सदैव असते देहात जे तेवते,
देती ज्ञान असे जनास अपुल्या जे ज्ञानमुद्रेतुनी ,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |७|
.
विश्वा पाहत कार्यकारणरुपे नात्यास्वरूपामध्ये,
स्वामी नोकर पितृपुत्री सहजी ये भेद ही प्रत्यये,
स्वप्नी जागृत तो पुरूष ज्या माया भ्रमी वेढते,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला  |८|
.
भू पाणी नभ अग्नि अंबर शशी भानू सवे जीवही,
वाटे सर्व चराचरात असती मूर्तीच त्या आठही,
नान्य किंचित ही असे परम त्या तत्त्वाहुनी वेगळे,
त्या या श्री गुरुमूर्तिला नमन हे श्री दक्षिणामूर्तिला |९|
.
आत्मतत्त्व चराचरात भरले सांगे असे स्तोत्र हे,
त्याच्या या श्रवणे तथा मनन नी ध्याने व संकिर्तने,
सर्वात्मत्त्वच प्रत्ययास विभुती ईशत्व ही प्राप्त ते,
त्या ऐश्वर्य मिळे सदैव मग ते, त्या अष्टसिद्धीसवे |१०|
.
(सौ. शैलजा शेवडे)





Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?