आम्ही गोपस्त्रिया नादावलो रे..!
तुझे रुप चित्तास मोहिनी घाली, खेचूनी घेई तुझी पावरी,
तोडून सारे संसारपाश, आलो तुझ्यापाशी आम्ही हरी ।
आम्ही गोपस्त्रिया, नादावलो रे, तूच रे तूच तू वसे अंतरी,
नको निष्ठुरा सांगू आम्हा असे, जाण्या परत ते आता घरी ।
त्यागून सा-या विषयवासना रे, झालो तुझ्या चरणात लीन,
तूच रे आता आप्त सखा अन, तुझ्यात सारी नाती विलीन ।
तुझ्याविण कोण प्रेमास पात्र, हृदयी वसे रे, तू एक मात्र,
जखडून गेलो तुझ्यापाशी आम्ही, कसला दिवस कसली रे रात्र
दूर लोटू मुरलीधरा रे, जाणून घे आमुच्या भावना रे,
ही पावले नाही ऐकती काही, जावू कशा आम्ही माघारी सांग रे
कर आमुचा माधवा, व्रजी जाऊनी काय करू यादवा,
व्याकुळलो आम्ही गोपस्त्रिया रे, तुझ्याविण आम्हा जगणे नको रे ।
अन्यथा विरहाग्नित दग्ध होऊ, देहास या त्यागूनीया देऊ,
ध्यान करीत तुझ्या चरणांचे, तुझ्याशी चिर-मीलीत होऊ ।
तूच रे वल्लभ, तूच रे पती,
तुझ्याविण आम्हा अन्य नाही गती...अन्य नाही गती..।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments