मुण्डकोपनिषद

कोणते हे झाड आहे, कोणते ते दोन पक्षी?

एक चाखी फळ रसाळ, दुसरा तो फक्त साक्षी ।

एकसाथ मित्र जणू ते, राहती झाडावरी,

वागण्यात भिन्नता, नवल हे खरोखरी ।

एक नाचे बागडे, गाई मधूर ते गीतही

रसाळ चाखतांना, विसरे देहभानही ।

आनंदे उपभोग घेई, स्वतःवरच प्रेम करी,

मी, माझा, माझी, माझे, घोष एकच अंतरी ।

उपभोगातून, आसक्तीतून, दुःख न कळे, आले कोठून,

क्लेश देती विषयवासना, जीव तळमळे अज्ञानातून ।

एकाच वृक्षावरी राहती, दोन पक्षी ते, जरी निरंतर

पक्षी अविचल बघूनी, पहिला कमी करू पाहे अंतर ।

दुसरा पक्षी उंच फांदीवर, कसा गाठू मी त्याला आता,

मी दुबळा, अगतिक केवळ, आता ही नवीनच चिंता ।

हा कुठला दुसरा पक्षी? जरी आहे माझाच सखा तो,

समजून घेईन त्याला मी पण, सुखदुःखाच्या, पार कसा तो ।

अहाहा! कु ठला तो दुसरा पक्षी, तो तर आहे, केवळ ईश्वर,

मी जीव, तो सखा? नाही नाही..मी आणि तो, एक खरोखर ।

मला समजले माझे मी पण, आता नाही उगाच वणवण,

मला न भिवविती क्षुधा नी तृष्णा, आता कसले, उगाच क्रंदन?

अपूर्ण...(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?