श्रावण आला, घेऊन आला,
श्रावण आला, घेऊन आला,इंद्रधनुष्यी आठवणीला,
पोरवयातील, नवथर हुरहूर,ऊनपाऊस खेळ रंगला ।
ते शिवमंदीर, नदीकिनारी,दूर कुठे ती घुमे बासरी,
अवखळ वारा येता जाता,घंटानादे मस्ती अन करी ।
श्रावणसरीची ओढ अनावर,नकळत गेले किती दूरवर,
कानी घुमती सूर जादुमय,हाक अनोखी रोखू कुठवर ।
झाडाखाली डोळे मिटूनी, वाजवी पावा, युवक तो कुणी,
तिथेच बसले भान हरपूनी,सूरवेडी जणू राधा बनुनी ।
काळ थबकला, मंतरले क्षण,मोहित सारे, वृक्षवेली पण,
सूर थांबले, भान जागले,सलज्ज तनुवर काटे फुलले ।
मुखकमल मग झाकून घेऊन,त्वरीत पळाले मी अन लाजून,
कोण कुठला, कुण्या गावचा, कसा भासला तो मज मोहन ।
किती श्रावण ते आले गेले,किती सावळे मेघ बरसले,
अजून शोधते कृष्णसख्याला,श्रावणसरींनी डोळे भरले ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments