रावण वध

रावण वध
.
आदित्य हृदय स्तोत्र म्हणूनी, मनोभावे सूर्यास प्रार्थूनी,
इंद्राच्या रथी सज्ज होऊनी, रावणवधिण्या राम निघाले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले ...|
.
बलाढ्य, पण दुर्बुद्धी रावण, देवांनाही अजिंक्य रावण,
वधावयाला त्याला मग, राम सिद्ध झाले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
शस्त्रअस्त्री, दोघे तुल्यबळ, दोघेही ते युद्धनिपुण,
एकमेकां वधिण्या इच्छुक, रणांगणी ठाकले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
शरवृष्टीने पृथ्वी हाले, सप्तसागर क्षुब्ध झाले,
बाणांनी आकाश व्यापले, सूर्यतेज निस्तेज भासले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
बाणाने रामाच्या एका, रावण मस्तक तुटून गेले,
दुसरे मस्तक तत्क्षणी आले, शंभर वेळा असेच झाले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
करुनी देत स्मरण रामा, इंद्रसारथी हळूच बोले,
'प्रभो वापरा, पैतामह अस्त्र , रावण मरण आज पातले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
ब्रह्मास्त्र प्रत्यंचेववरी, राम अभिमंत्रित करी,
पृथ्वी थरथरली, राक्षसहृदयी भय भरून गेले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
आकर्ण धनुष्य ओढून,राम सोडितो बाण,
आदळे रावण वक्षस्थळी,हृदय फोडुनी टाकले,
युद्ध सुरु झाले, अलौकिक युद्ध सुरु झाले |
.
रावणाचा घेऊनी प्राण, अस्त्र शिरे रामभात्यात,
मुखातून रक्त ओकत, मृत रावण भूमीवर कोसळे,
युद्ध ते वेगळे , अलौकिक युद्धच ते वेगळे |
.
रावणवध झाला, रामाने, रावण वध केला,
विजयोन्मादे गर्जती वानर, आनंद फार झाला.
नभी दुंदुभी वाजू लागती, दिव्यगंधे वायू वाहती,
पुष्पवृष्टी हो, रामरथावर , दिशा स्वच्छ झाल्या,
रावणवध झाला, जय तो रामाचा झाला |
.
सीतापतीरामचंद्रकी जय....!
.
(सौ. शैलजा शेवडे)
.

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?