कुब्जा
कुरूप कुब्जा, दासी कुब्जा,
झुकलेली नित होते मी तर,
कोण मग ही आरशातली,
निर्मल ललना, अतीव सुंदर !
किती वाकुडी किती बापुडी
कधी न पाहिले मला दर्पणी ,
कोण मग ही आरशातली,
रंभा, उर्वशी दिव्य पद्मिनी |
.
मयूरमुकुटी, भक्तवत्सल,
नटवरनागर, असा श्रीहरी,
मधुरामार्गावरी पुकारी,
मला कृष्ण तो, 'अगं सुंदरी ' |
.
'लाव गंध मज ललाटावरी.
हसून म्हणे मज, तो ब्रजभूषण,
काय तयाचे रूप देखणे,
खुळ्यागत मी गेले हरवून |
.
चंदनउटी तया लावता,
स्पर्श तनुला, श्रीचरणांचा
कुरूप वक्रता,क्षणात गेली,
जयघोष मनी मग श्रीरंगाचा |
.
कायापालट नाही केवळ,
नाही केवळ कुबडच गेले,
मलीन मानस निघून गेले,
अंतर्बाह्य हरीची झाले |
.
काम क्रोध मोहाने होते,
त्रिवक्रा मी दुर्गुणी नारी
श्यामरंगात होई पवित्र
त्रिविक्रमाची जादू ही सारी |
.
प्रेमरस उद्दीप्त करी मग,
तो मुरलीधर, व्रजेन्द्रनंदन,
येईन नक्की तुझ्याकडे मी,
गेला सांगून, तो ब्रजमोहन |
.
सुंदर काया त्याची किमया,
करेन मग मी त्याला अर्पण,
येईल येईल तो ब्रजभूषण ,
धन्य धन्य मग होईल तनमन |
.
सौ.शैलजा शेवडे
.
Comments