सरस्वती वंदितो तुला

सरस्वती वंदितो तुला, श्रीविद्या तू भारती,
ज्ञानक्षुधित बालकां या, दे प्रकाश सन्मती ।
.
तू भाषा अक्षरा स्वरा, तूच ब्राह्मी शारदा,
आलो तुझ्या शरण पदा, कर कृपा हे ज्ञानदा,
धीश्वरी, वागीश्वरी, कवीश्वरी ही तूच ती,
ज्ञानक्षुधित बालकां या, दे प्रकाश सन्मती |
.
वीणाधारिणी, पुस्तककरी, तूच हंसवाहिनी,
शब्दब्रह्म मातृका तू, तू स्वरा सत्वगुणी ।
ब्रह्म विष्णु महेशही, मानसी तुज वंदिती,
ज्ञानक्षुधित बालकां या, दे प्रकाश सन्मती ।
.
माला ती स्फटिकांची, हाती तुझ्या विलासते,
शुभ्रवसना शरदिनी, तू शरदचांदणे भासते ।
कवित्व दे, वरदायिनी, बुद्धी दे, देई स्मृती ।
ज्ञानक्षुधित बालकां या, दे प्रकाश सन्मती ।
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?