कुठे मनास गुंतवू?

कुठे मनास गुंतवू, अनोळखी दिशा दिशा,
नभात दूर पाखरू, रित्याच पापण्या कशा ।

भकास पायवाट ही, कुणास बोल लावणे,
नसे कुणीच सोबती, असार हे जिणे जिणे ।

अजून पोकळीच का, भरून अंतरी असे,
अथांग सागरात या, कुठून लाटही नसे?

रटाळ वाटते कथा, मिटून जात लोचने,
उगाच वाचुनी तरी, असाच काळ रेटणे ।

बरीच अक्षरे पुन्हा, रुसून कोप-यात का,
कुणास काय सांगणे, रुची न त्यात आज का?

ढगास या अता तरी, हळूच टोचवा कुणी,
हताश मागणी लपे, उदास भास अंगणी ।

कुणास आपला म्हणू, कुठे निरोप पाठवू,
किती मनास आवरू, कुठे मनास गुंतवू?

(सौ. शैलजा शेवडे )

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?