गणाधीश हे, विघ्नहरा रे...

एक ध्येय ते, तुला जाणणे, एक लक्ष्य ते, तुला शोधणे,
गणाधीश हे, विघ्नहरा रे, उपासनेतून तुज आकळणे ।
एक ध्येय ते तुला जाणणे ।

कोणी म्हणती, महानाद तू, शब्दब्रह्म ओंकारस्वरुप तू,
काय नेमका कसा असे तू, निर्गुणाचा अर्थ उमगणे ।
एक ध्येय ते, तुला जाणणे।

स्तिमित करते रूप मनोहर, वक्रतुंड तू हे लंबोदर,
गजमुख तरी अतीवसुंदर, रुपकांमधूनी तुला समजणे ।
एक ध्येय ते, तुला जाणणे ।

अनंत नावे तुझी गणेशा, कपिल विकट हे पूर्णपरेशा,
सगुण, निर्गुण, प्रमथाधीशा, स्तवनातून तुज प्रसन्न करणे ।
एक ध्येय ते, तुला जाणणे ।

मूर्तीमंत तू ज्ञान गणपती, भ्रमित मन मम तोकडी गती,
चिंतनातूनी, अंतरातूनी, आनंदाचा स्त्रोत मिळवणे ।
एक ध्येय ते, तुला जाणणे ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?