भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश केला. उत्तरायण सुरू झाले. त्यांनी
आपले मरण जाणले. समोर उभ्या असलेल्या श्रीकष्णावर नजर खिळवली. आणि त्याची
प्रार्थना सुरू केली. ही प्रार्थना मी माझ्या शब्दात लिहितेयं.

शरशय्येवर भीष्म पितामह,

निरखती निरखती देवकीनंदन,

विजितात्मा ते विमुक्त होऊन,

प्रसन्नतेने प्रार्थती स्तवन ।


’रूप सावळे, त्रिभुवनसुंदर,

कुंतल कुरळे मुखकमलावर,

पार्थसख्या, श्रीकृष्णजनार्दन,

ठायी तुझ्या मम भक्ती समर्पण ।


युध्दी, वदन धुळ माखल्या,

धर्मबिंदु केसात अडकल्या,

मम बाणांचे कवच वेढल्या,

श्रीकृष्णा त्या चित्त समर्पण ।


पार्थवचने, युध्दभूमीवर

रथ नेऊनी तत्काळ मधोमध

दृष्टीने रिपु आयु हरण,

श्रीकृष्णा त्या वृत्ती समर्पण ।


आप्तवध तो अधर्म समजून,

युध्द नकोशा पार्था जाणून,

आत्मविद्या करिती कथन,

परमपुरुषा, प्रीती समर्पण ।


मम प्रतिज्ञा सत्य कराया,

स्वप्रतिज्ञा मोडून आले,

हाती चक्र, भूमी डळमळे,

वधण्या हत्ती सिंह जणू चाले ।


आततायी मी शरवर्षावे, 

जखमी केले कवच भेदून,

वधावया मज येती धावून,

तया मुकुंदा गती समर्पण ।


विजयरथस्थित बघता श्रीमुख,

 वीर पावले, मुक्ती सरूप,

इच्छामरणी मम अंतकाळी,

श्रीकृष्णा परमप्रीती समर्पण ।


गोपी गौरवसी, प्रेमे बोलून,

गर्वही हरसी विरह देऊन,

अनुसरती तव लीला मोहन,.

श्रीकृष्णा तुज, वृत्ती समर्पण ।


राजसूय यज्ञात दाखवी,

अद्भूत ते विराट दर्शन,

पुजती तुजला नृपवर मुनिगण,

हे विश्वात्म्या, चित्त समर्पण ।


अनंतरूपे, एक अजन्म,

सर्वांहृदयी एक जनार्दन,

भेदरहित मी सारे जाणून,

परमात्म्या, तुज प्राण समर्पण  ।


 ( सौ. शैलजा शेवडे )

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?