मनी राम नाही, असे सर्व व्यर्थ ।

नभी चंद्र तारे, सुगंधित वारे, गमे का तरीही, असे सर्व व्यर्थ,
जिवाला विसावा, कसा तो मिळावा, मनी राम नाही, असे सर्व व्यर्थ ।

किती ज्ञान भांडार, सन्मान लोकी, किती चाहते ही, पुढे ते सभोती,
तरी वेढुनी ती, असे का उदासी, मनी राम नाही, असे सर्व व्यर्थ ।

कुठे ना जरासे कमी ही, कधीही, मिळे सर्व काही न मागे तरीही,
रुते काय ते, कोण जाणे जराही, मनी राम नाही, असे सर्व व्यर्थ ।

घरी आणि दारी, यशस्वी यशस्वी, किती प्रेमपाशे, जगी गुंतणे ही,
तरी का अशांती असे सर्वकाळी, मनी राम नाही असे सर्व व्यर्थ ।

किती पूजने ती, किती आरत्याही, किती किर्तने गायने घोष तेही,
जिवाच्या तरूला नवा कोंब नाही, मनी राम नाही, असे सर्व व्यर्थ ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?