जरा मोकळे रे मला होऊ दे,

जरा थांबवी रे तुझे पाहणे हे,
जरा मोकळे रे मला होऊ दे,
नको वेध घेऊ उगा तू मनाचा,
जरा मोकळे रे मला गाऊ दे ।
जरी हा मुखवटा, तरी सौख्यदायी,
असे हासणे अन, जना हासविणे,
नको कींव माझी अशी दाखवू रे,
माझ्याच मस्तीत पुढे जाऊ दे ।
लिहू दे कविता मला मुक्त माझी,
नको डोकवू गूढ असतील शब्द,
कधी हासू अन कधी आसवे ती,
मोकळ्या भावनात मला न्हाऊ दे ।
रेखाटू दे कागदावरी चित्र आज,
नको लावू त्याचा संदर्भ काही,
असू दे जरा गुंतलेल्याच रेषा,
उगा हरवूनी मला जाऊ दे ।
जरी तू प्राणाहूनी प्रिय आहे,
तरी कॊडलेला असा श्वास आहे,
जरा दूर हो रे, रागवू नको रे,
अलिप्त माझी मला पाहू दे ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

एक कविता आणि अनेक पैलू, प्रतिबिंब, सावल्या, इत्यादि.
कवीच्या मनांत एक विचार असतो व वाचणार्‍याच्या मनात एक. ही कविता लिहिताना तुमचा काय विचार होता हे माहित नाही, पण ते जाणून घ्यायला आवडेल.
मला वाचता क्षणी जे काही वाटलं ते असं -
आजूबाजूच्या समाजातल्या शिष्टाचारांमुळे किंवा आपल्या इच्छा-आकांक्षांमुळे आपण आपल्या "स्व"भावापासून दूर जात असतो. अशा परिस्थितीत आपला आतला आवाज आपल्याशी बोलतोय व आपले विचार आपल्याला व्यक्त करतोय असा आभास या कवितेतून झाला.

मस्तच झाली आहे कविता.
अशक्य सुंदर लिहिलंस, शैलजा मावशी..

- अवनी राजोपाध्ये

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?