छेडिला मल्हार तू माझ्याचसाठी, माझ्याचसाठी

लेऊन आले ग्रीष्मझळांना, त्या दुपारी भेटीसाठी,

छेडिला मल्हार तू, माझ्याचसाठी, माझ्याचसाठी ।

भारलेली मी खुळी, अन रोखलेले नजरभाले,

जाणीवा होत्या कुणाला,कोण ते मौनात बोले,

खुणवीत होती पावलांना, कोठली घुंगूरकाठी,

छेडिला मल्हार तू, माझ्याचसाठी, माझ्याचसाठी ।

मंत्रमुग्ध मी अन, गारूड तुझे संगीत होते,

दिडदा दिडदा, सतारीत,कोणते ते गीत होते,

काय लोकांना कळाव्या, कोठल्या रेशीमगाठी,

छेडिला मल्हार तू, माझ्याचसाठी, माझ्याचसाठी ।

पोळलेली पाऊले, वैशाखवणवा अंतरंगी,

कोसळे पाऊस कुठूनी, चिम्ब मी आनंदरंगी,

ही दुनिया कोणती रे, हा सुरांचा हात हाती,

छेडिला मल्हार तू, माझ्याचसाठी, माझ्याचसाठी ।(सौ.शैलजा शेवडे)

Comments

Kreative soul said…
kavita chan aahe. mala avadli.
kavitechi survatch malhar... pasun ahe.. jo maza avdata rag aahe.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?