धगधगणा-या ज्वालेचे हे गा-हाणे कृष्णा,
तडफडणा-या तृष्णेचे आक्रोशणे कृष्णा,
रुद्ध मनाने तुला सांगते ,
ऐक रे कृष्णा , न्याय दे कृष्णा....|
.
याज्ञसेनी मी, तुझी सखी मी,
पांडवांची पत्नी रे मी,
तरीही माझी बेअब्रू ती,
कशी झाली कृष्णा, न्याय दे कृष्णा..|
.
कमललोचना, तुझ्या सखीला,
खेचूनी नेले धरुनी कुंतला,
दुःशासन तो, अधमाला त्या,
कसली रे शिक्षा? न्याय दे कृष्णा |
.
कापत होते, लज्जेने रे,
भीतीने अन अपमानाने,
रजस्वला त्या, मला पाहूनी,
हसतो पापात्मा, न्याय दे कृष्णा |
.
हात घालिती मम वस्त्राला,
मांडी दावती बसावयाला,
उपभोगाया उत्सुक पापी,
भरसभेत मजला, न्याय दे कृष्णा |
.
माझ्यासाठी कोणीही नाही,
पिता, पुत्र अन बंधूही नाही,
मधुसूदना रे, तू ही नाही,
उपेक्षसी वेदना, न्याय दे कृष्णा |
.
शरण तुला रे, तुलाच कृष्णा,
तूची समर्थ, मला रक्षिण्या,
गौरवशाली तुझी सखी रे,
जाण तू कृष्णा, न्याय दे कृष्णा |
.
( सौ. शैलजा भा. शेवडे )
Comments