ॐ नमः शिवाय |
ॐ नमः शिवाय |
.
शिव..निराकार परमात्मा..! सर्वव्यापी परब्रह्म...! तो सगुणही आहे..! जटाजूट धारी, त्रिनेत्रधारी, डोक्यावर चंद्रमा, हातात त्रिशूल, नीलकंठ पार्वतीपती ...त्याला लयकर्ता म्हणतात..तो महारुद्र आहे..कोपिष्ट आहे..पण तो भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ आहे..आशुतोष आहे...लगेच प्रसन्न होणारा, पावणारा आहे....तो गुरु आहे..तो मार्गबंधु आहे...जीवनाच्या सुपथा वर आपली साथसंगत करणारा आहे.....तुम्ही त्याला प्रेमाने भक्तीने हाक मारा, तो नक्की धावून येतोच..येतो म्हणजे सतत आपल्या अवती भवती असतोच..पण आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते..त्याची आश्वासकता जाणवते...! शिव म्हणजेच कल्याणकारी...! शिव म्हणजेच शुभंकर...! तो आपल्याबरोबर आहेच आहे....!
.
असे तो तुझ्या नेहमी, संगती रे, ... . महादेव शंभू अपर्णापती ,
नसे एकला तू, कधीही प्रवासी, ......असे सोबती तो उमेचा पती |
.
कधी कोवळेसे रवी बिंब भासे, ........कधी तप्त आभेमध्ये तो विलासे,
विरुपाक्ष ज्योतिर्मयी शांतरुपी , ......कधी रुद्र विक्राळ त्याचीच मूर्ती |
.
वसंतातली पालवी हास्य त्याचे, .........त्रिलोकेश त्या सर्वलोकेश्वराचे,
नभातून तो मेघ वर्षाव वाटे, ............कृपावंत देणे जटाशंकराचे |
.
कधी थंड वारे, तसा गारवाही, .........पहा त्यात कैलासनाथास तू ही,
हिवाळ्यातली तीच निःष्पर्ण सृष्टी .. .अपर्णापतीची असे तीही दृष्टी |
.
यमाच्या भया त्या धरीसी कशाला,. ...स्मरावे सदा नित्य मृत्युंजयाला,
महाकाल ईशान गंगाधराला, .............महादेव, देवेश , सर्वेश्वराला |
.
.
.सौ. शैलजा भा. शेवडे.,
Comments