गोविंद दामोदर माधवा रे ..

गोविंद दामोदर माधवा रे....
.
विरहभयाने गोपी रडती,
' कृष्णा कृष्णा ' विलाप करती, 
' जगायचे रे कसे तुझ्याविण?''
लज्जा सोडून खुशाल म्हणती |
.
म्लान मुखावर अश्रुधारा,
कृष्णचिंतनी व्याकुळ साऱ्या,
विसरुनि जाती गृहसंसारा, 
तडफडती त्या विरहकातरा |
.
'सांग विधात्या, काय म्हणावे,
दुष्टाव्यास तव किती निंदावे?
का लोकांना जवळ आणसी,
आणि मग का विरह घडविसी?'
.
बोल लाविती त्या अक्रुरा, 
अक्रुर नाही, तू रे क्रुरा, 
प्रिय कृष्णाला घेऊन जाशी,
दया जराही नाही निष्ठुरा |
.
रुष्टती मग त्या, प्रिय कृष्णावरी,
असा कसा हा दुष्ट श्रीहरी,
आम्ही भाळलो, घरा विसरलो,
नजर न टाकी परी अमुच्यावरी |
.
' रासक्रीडा ती, प्रेमालिंगन, 
ते मधुभाषण, मुरलीवादन,
सांग कसे रे राहु तुझ्याविण,
नको जाऊ रे, येई परतून |

प्रिय कृष्णा तू ऐक ना रे,
सोडून आम्हा जाऊ नको रे,
गोविंद दामोदर माधवा रे, 
गोविंद दामोदर माधवा रे |
.
.
( सौ. शैलजा शेवडे )

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?