तोडून सा-या संसारपाशा

तोडून सा-या संसारपाशा, .......आलो इथे रे,आम्ही श्रीहरी ।
का सांगसी निष्ठुरा,प्राणनाथा, ..परतून जाण्या,आम्हाला घरी ?
.
तुझे रूप,चित्तास मोहिनी घाली, .मना खेचते रे, तुझी बासरी,
गोपस्त्रिया आम्ही,नादावलो रे, ...वसे तूच रे तू, आम्हां अंतरी |
.
त्यागून सा-या विषयवासना रे, ...झालो तुझ्या आम्ही चरणात लीन,
असे तूच रे आप्त,सखा आमुचा अन, तुझ्यामध्ये सारी,नाती विलीन ।
.
तुझ्याविण ते कोण प्रेमास पात्र? ...हृदयी वसे रे, तू एक मात्र,
जखडून गेलो तुझ्यापाशी आम्ही, ..कसला दिवस ,कसली रे रात्र?
.
नको दूर लोटू, मुरलीधरा रे, .........जाणून घे तू, या भावना रे,
ऐकत नाही, ही पावले रे, ............माघारी आम्ही जावू कशा रे?
.
स्वीकार कर, आमुचा माधवा रे,... व्रजी जाणे नाही,अता यादवा रे,
व्याकूळलो, आम्ही गोपस्त्रिया रे,.. तुझ्याविण आम्हा जगणे नको रे ।
.
वा दग्ध होऊ विरहाग्नि आम्ही, .....देहास या आणि, त्यागून देऊ,
लावून ध्यान,तुझ्या पावलांशी, ......तुझ्यातच, चिर-मीलीत होऊ ।
.
कृष्णा, मनमोहना, यादवा रे, ......सखा, वल्लभा तूच, अमुचा पती,
तुझ्याविण आम्हां नाही गती रे,... तुझ्याविण आम्हां नाही गती ।
.
.
( सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?