शबरी

शबरी
श्रीरामा, राघवा, रघुवीरा, स्वागत करू मी कसे?
अत्यानंदे काही सुचेना, काय साजरे दिसे?
...
किती ऋतु ते आले गेले, प्रतीक्षेत हे, जीवन सरले,
आज तुम्ही प्रत्यक्ष समोरी, सत्य म्हणू की पिसे? ।


काय करावी कशी अर्चना, अश्रुंचा ये पूर लोचना,
जराजर्जर हा देह थरथरे, कंठी शब्दही नसे ।


स्वीकारावी, बोरे मधुरही, शोधून शोधून आणली मी,
नको मनी ती किंचित शंका, चाखली मी ती असे ।


भिल्लीण शबरी मी रानीची, शिष्या मी मातंग मुनींची,
चिंतन तुमचे, सदा करावे, उ्पदेश त्यांचा असे ।


त्यांनीच दिला मजला हा वर, ’भेटाया तुज, येतील रघुवर ’
अंतर्यामी, तुम्ही जाणता, वाट पाहणे कसे ।


प्रत्येक सूर्य सांगी उगवून,’आज होईल, प्रभुचे दर्शन, ’
मावळतांना बोले हसून, ’उद्या नक्की येतसे ’


वृक्षवेली या, इथले वनचर, हर्षित सारे, आज खरोखर,
निर्झरही आनंदे मंजुळ, गीत जणु गातसे ।


धन्य माझी ही जर्जर काया, आज भेटलात हे रघुराया,
द्यावी संमती, प्राण त्यजाया, जीवन सार्थकसे ।


(सौ शैलजा शेवडे)

Comments

Dr T K Gopalan said…
I wish to know the meaning of the word चर्पट and पंजरिका. Why don't these words figure in Monier Williams dictionary? You only are told elsewhere that the two words together mean eighteen gems of wisdom. If you are a Sanskrit scholar please reply.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?