एक गोपिका हिरमुसलेली...

शाम रंगी त्या धुंद गवळणी, इंद्रपुरी जणु अवतरलेली ।
वृंदावनी या, बघ रे कान्हा, एक गोपिका हिरमुसलेली,


रंगरंगीली,सारी अवनी, रंगमाखले मेघही गगनी,
कुंकुम केशर गंध उधळूनी, पळस हसे तो मादक बनुनी...



मंतरलेले,सारे सारे अंतर झाले मुक्त मोकळे
रंग बने अनुराग गोकुळी, एक गोपिका हिरमुसलेली ।



बासरीच्या त्या मधूर सुरांना, मृदुंग देई ताल धिंधिना,
गोड गळ्याने कोणी घेई, सहज सुंदर चढत्या ताना,

मुठीमुठीने गुलाल टाकत, खट्याळ मोहन खेळे होळी,
दूरवरि मूक अश्रु ढाळी,एक गोपिका हिरमुसलेली ।


अभिमान वा, संकोच या मना, कशी येऊ मी, रंग खेळण्या,
का न कळाव्या, नंदनंदना, सांग तुला या भावभावना?


ये रे येरे, सत्वरी येरे, कमललोचना, रंगवी मज रे
व्याकुळलेली, आसुसलेली, बघ ही गोपिका हिरमुसलेली ।




(सौ शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?